५० कोटींचे बांधकाम, तर २५ कोटींचे यंत्र
By Admin | Published: May 23, 2017 01:50 AM2017-05-23T01:50:41+5:302017-05-23T01:50:41+5:30
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत.
‘सुपर’च्या १०० कोटीतून साधणार विकास : ‘पेडियाट्रिक सर्जरी’साठी प्रयत्न होणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १०० कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहेत. या निधीतून दरवर्षी २० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. याचा आराखडा लवकरच शासनाला सादर केला जाणार असला तरी तूर्तास पुढील पाच वर्षांत या निधीतून ५० कोटींचे बांधकाम, २५ कोटींचे यंत्र व २५ कोटी मनुष्यबळावर खर्च करण्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांचे निर्देश आहेत.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रु ग्णालयाशी संलग्न असलेल्या सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विदर्भच नाही तर आजूबाजूच्या राज्यातून येणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. सद्यस्थितीत हृदय शल्यचिकित्साशास्त्र, हृदयरोग, गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरोसर्जरी, नेफ्रोलॉजी, यूरोसर्जरी व एन्डोक्रेनोलॉजी या आठ विभागातून रुग्णसेवा दिली जात आहे. यात आणखी नव्या विभागाची भर पडावी व रुग्णांना अद्ययावत उपचार मिळावेत म्हणून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यानुसार रुग्णालय प्रशासन कामाला लागले आहे.
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मधुकर परचंड यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी उपलब्ध करून दिलेल्या १०० कोटींच्या निधीमधून दरवर्षी २० कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. २०१७-१८ मध्ये १० कोटी बांधकामावर, पाच कोटी यंत्रसामुग्रीवर तर पाच कोटी मनुष्यबळावर खर्च होणार आहे.
अशाच पद्धतीने नियोजन पुढील पाच वर्षांसाठी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, पहिल्या वर्षात ‘पेडियाट्रिक सर्जरी’ व ‘एन्डोक्रेनोलॉजी’चा वॉर्ड सुरू करण्याचा विचार आहे. यासंदर्भात संबंधित विभागप्रमुखांना प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शिवाय, रक्तपेढीसाठी ‘ब्लड कॉम्पोनंट’ यंत्र, बाह्यरुग्ण विभागाचे बांधकाम, ‘ए’ विंगचे बांधकाम, अद्ययावत कॅथलॅब व प्रतीक्षालयाचे बांधकाम हाती घेण्याला प्राधान्य दिले जाणार आहे. यासंदर्भात २ जून रोजी बैठक बोलविण्यात आली असून, प्रस्तावित कामांचे नियोजन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले.