अॅक्वा लाईन मार्गावर सातवे बन्सीनगर स्टेशन तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2020 01:50 AM2020-08-30T01:50:45+5:302020-08-30T01:51:51+5:30
अॅक्वा लाईन मार्गावर बन्सीनगर मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता सुसज्ज झाले आहे. या मार्गावर हे सातव्या क्रमांकाचे स्टेशन आहे. सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगरदरम्यान असलेल्या या मार्गावर एकूण ११ स्टेशन प्रस्तावित आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : अॅक्वा लाईन मार्गावर बन्सीनगर मेट्रो स्टेशन प्रवासी सेवेकरिता सुसज्ज झाले आहे. या मार्गावर हे सातव्या क्रमांकाचे स्टेशन आहे.
सीताबर्डी इंटरचेंज ते लोकमान्य नगरदरम्यान असलेल्या या मार्गावर एकूण ११ स्टेशन प्रस्तावित आहेत. लोकमान्य नगर, बन्सीनगर, वासुदेवनगर, रचना रिंग रोड, सुभाषनगर,अंबाझरी लेक व्ह्यू, एलएडी स्क्वेअर, शंकरनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी इंटरचेंज अशी या सर्व स्टेशनची नावे आहेत.
कोरोनामुळे सध्या मेट्रो सेवा थांबली असली तरीही या ११ स्थानकांपैकी लोकमान्य नगर, वासुदेवनगर, सुभाषनगर, इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअर्स, झाशी राणी स्क्वेअर आणि सीताबर्डी असे एकूण ६ मेट्रो स्टेशनवरून प्रवासी वाहतूक पूर्वीच सुरू झाली आहे.
स्टेशनलगतच्या परिसरात अनेक शैक्षणिक संस्था, औद्योगिक वसाहत, मोठी बाजारपेठ असल्यामुळे या परिसरात प्रवाशांची नेहमीच गर्दी असते. गेल्या काही वर्षात हिंगणा मार्गाच्या दोन्हीही बाजूला रहिवासी संकुलांची मोठ्या प्रमाणात भर पडल्याने या भागातील लोकसंख्या वाढली आहे. यामुळे या मार्गावर नोकरी, शिक्षण किंवा उद्योगाच्या निमित्ताने रोज प्रवास करणाऱ्या तसेच येथील रहिवाशांना या स्टेशनचा नक्कीच फायदा मिळणार आहे.
बन्सीनगर स्टेशनची उभारणी ५८० वर्ग मीटरमध्ये असून दोन्ही (उत्तर व दक्षिण) बाजूने आगमन/निर्गमनाची व्यवस्था आहे. ग्राऊंड लेव्हल, कॉनकोर्स लेव्हल आणि प्लॅटफॉर्म अशा तीन मजलीच्या दुसऱ्या म्हणजेच कॉनकोर्स लेव्हलवर तिकीट काऊंटर व स्टेशन कंट्रोल रूम तयार करण्यात आली आहे. स्टेशनवर आपात्कालीन परिस्थितीचा सामना करण्याकरिता बेसमेंटमध्ये अग्निशामक टँंक, छतावर सौर पॅनेलची व्यवस्था असून सौर पॅनेल निर्मित वीज थेट ग्रीडमध्ये येणार असल्याने ऑपरेशन खर्च कमी होणार आहे. याशिवाय ग्रीन बिल्डिंगच्या नियमांनुसार बायो डायजेस्टरने सुसज्ज, स्टेशनच्या दोन्ही बाजूने पायऱ्या, एस्केलेटरमुळे ग्राऊंड फ्लोअर ते कॉनकोर्स आणि कॉनकोर्स ते प्लॅटफॉर्मदरम्यान चढणे किंवा उतरणे सहज शक्य, दिव्यांग व्यक्तींसाठी लिफ्टची सुविधा, अखंड वीज पुरवठ्यासाठी यूपीएससह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि प्लॅटफॉर्मवर प्रवासी घोषणा प्रणाली, रेन वॉटर हार्वेस्टिंग किंवा पावसाचे पाणी साठवून ठेवण्याकरिता तरतूद, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छतागृहांची व्यवस्था, लहान मुलांच्या देखरेखीकरिता स्वतंत्र खोली (बेबी केअर रूम), कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, संपूर्ण स्टेशनवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची निगराणी आदी वैशिष्ट्ये आहेत.