वर्धा जिल्ह्यातील सिंदीत ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी लागणाऱ्या कोचेसची होणार निर्मिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2019 11:19 AM2019-09-02T11:19:08+5:302019-09-02T11:20:52+5:30
मेट्रो नागपुरातून ब्रॉण्डगेजवर धावणार आहे. ब्रॉडगेजसाठी लागणाऱ्या कोचेसची (रोलिंग स्टॉक) निर्मिती वर्धेतील सिंदी येथे होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो नागपुरातून ब्रॉण्डगेजवर धावणार आहे. ब्रॉडगेजसाठी लागणाऱ्या कोचेसची (रोलिंग स्टॉक) निर्मिती वर्धेतील सिंदी येथे होणार आहे. या प्रकल्पाचा शुभारंभ ७ सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक आणि सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे दिली.
रविवारी हॉटेल सेंटर पॉर्इंटमध्ये आयोजित विशेष सोहळ्यात लोकमतच्या पॉलिटिकल आॅयकॉनचे लोकार्पण नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. ते म्हणाले, वर्धा जिल्ह्यातील सिंदी येथे ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी लागणाऱ्या ‘रोलिंग स्टॉक’च्या उत्पादन प्रकल्पाची स्थापना होणार आहे. गोंदियापासून ते वर्धेपर्यंत, रामटेक ते वर्धा, नरखेड ते वर्धा या मार्गावर ब्रॉडगेजवर मेट्रो चालविण्याचा माझा संकल्प अधिकाऱ्यांसमोर बोलून दाखविला तेव्हा त्यांनी विरोध केला. त्यात रेल्वेचेही अधिकारी होते. पण मी माझ्या संकल्पावर ठाम होतो. पाठलाग केला. आता हा प्रकल्प सुरू होणार आहे. पायाभूत सुविधा रेल्वेच्या राहणार आहे. त्यामुळे रेल्वेचे नुकसान भरुन निघेल. ‘मेट्रो’चा प्रति किलोमीटर बांधकाम खर्च ३५० कोटी आहे तर ‘ब्रॉडगेज मेट्रो’चा हाच खर्च साडेतीन कोटी इतका आहे. पॅसेंजरचा वेग प्रति तास ४० कि़मी., एक्स्पे्रसची गती १६० कि़मी. आणि मेट्रोची गती प्रति तास १२० कि़मी. आहे. त्यामुळे पॅसेंजर धावणे बंद होईल. पुढे मेट्रो बडनेरापर्यंतही नेता येईल. त्यामुळे सुलभ आणि जलद सेवा मिळणार आहे.
हा प्रकल्प ५० एकरात तीन टप्प्यात जवळपास ९०० कोटींच्या गुंतवणुकीतून पूर्ण होणार असल्याची माहिती आहे. पहिल्या टप्प्यात २८० कोटींची गुंतवणूक होणार आहे. या टप्प्यात महामेट्रो गुंतवणूक करणार आहे.
महामेट्रोच्या नागपूर प्रकल्पांतर्गत हिंगणा मार्गावरील लोकमान्यनगर ते सीताबर्डी या रिच-३ दरम्यान व्यावसायिक रन सुरू होणार आहे. या मेट्रो मार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ सप्टेंबरला नागपुरात येणार आहेत. कार्यक्रम कस्तूरचंद पार्कवर होणार आहे. या दरम्यान ‘ब्रॉडगेज मेट्रो’साठी लागणाऱ्या कोच निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.