नागपुरात या ठिकाणी सुरू आहे देशातील पहिल्या चारस्तरीय वाहतूक व्यवस्थेची उभारणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 08:37 PM2020-02-26T20:37:17+5:302020-02-26T20:38:55+5:30
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम आणि सध्याच्या रेल्वे लाईनवर मेट्रो मार्गिकेच्या बांधकामाला महामेट्रोने सुरुवात केली आहे. या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेल्या चारस्तरीय बांधकाम केल्या जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूरमेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या कामठी मार्गावरील उड्डाणपुलाचे बांधकाम आणि सध्याच्या रेल्वे लाईनवर मेट्रो मार्गिकेच्या बांधकामाला महामेट्रोने सुरुवात केली आहे. या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वेगळ्या पद्धतीची संरचना असलेल्या चारस्तरीय बांधकाम केल्या जात आहे.
मध्य रेल्वेने गड्डीगोदाम येथील रेल्वेच्या जमिनीवर निर्माणकार्याकरिता परवानगी दिली असून पायलिंगच्या कामाला सुरुवात झाली आहे. प्रस्तावित डबल डेकर स्ट्रक्चर कामठी मार्ग, गड्डीगोदाम येथील गुरुद्वाराजवळील रेल्वे लाईनला क्रॉस करणार आहे. कार्य अतिशय कठीण असून सतत व्यस्त अशा रेल्वेलाईनच्या गड्डीगोदाम येथील आरयूबी येथे करण्यात येत आहे.
गड्डीगोदाम क्रॉसिंग येथील संरचनेत चारस्तरीय वाहतूक व्यवस्था आहे. पहिल्या स्तरावर जमिनी मार्ग (आरयूबी मार्ग), दुसऱ्या स्तरावर रेल्वे ट्रॅक, निर्माणकार्य पूर्ण झाल्यावर तिसºया आणि चौथ्या स्तरावर उड्डाणपूल आणि मेट्रो मार्गिका राहील. कामठी मार्गाच्या दोन्ही बाजूला कॉलेज, व्यापारी संकुल, बँक, शासकीय कार्यालये आहेत. हा मार्ग उत्तर आणि दक्षिण नागपूरला जोडणारा प्रमुख आहे. रिझर्व्ह बँक, कस्तूरचंद पार्क, सीताबर्डी किल्ला असे प्रमुख ऐतिहासिक स्थळ आहेत.
प्रस्तावित उड्डाणपूल आणि मेट्रो ट्रॅकला ‘राईट ऑफ वे’ म्हणतात. म्हणजेच या दोन संरचनेचे निर्माणकार्य एका सिंगल पिलरवर होणार आहे. त्यामुळे किंमत आणि रस्त्यावरील जागेचा कमी उपयोग होईल. नागपूर मेट्रो रेल प्रकल्पाच्या रिच-२ अंतर्गत चारस्तरीय वाहतूक व्यवस्थेची रचना असून, सीताबर्डी इंटरचेंज ते ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनपर्यंत ७.३० किमी लांब आहे. यामध्ये झिरो माईल, कस्तूरचंद पार्क, गड्डीगोदाम चौक, कडबी चौक, इंदोरा चौक, नारी रोड आणि ऑटोमोटिव्ह चौक मेट्रो स्टेशनचा समावेश आहे. याअंतर्गत ऑटोमोटिव्ह चौक ते गड्डीगोदामपर्यंत ५.३ किमीचा भाग डबल डेकर उड्डाणपुलाचा आहे. तिसऱ्या स्तरावरील उड्डाणपूल चार पदरी वाहतुकीकरिता राहणार आहे. तांत्रिकदृष्ट्या पाहता १४०० मेट्रिक टन वजनाचे स्टील कम्पोझिट गर्डर रेल्वे ट्रॅकवर योग्य पद्धतीने ठेवण्यात येणार आहे.