भांडेवाडीत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घरांची निर्मिती होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2018 10:56 PM2018-07-16T22:56:43+5:302018-07-16T22:59:47+5:30
कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायो मायनिंगच्या माध्यमातून बगीचा आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत किफायत घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपुर : कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्यामुळे भांडेवाडी डम्पिंग यार्ड येथे बायो मायनिंगच्या माध्यमातून बगीचा आणि पंतप्रधान आवास योजनेंतर्गत किफायत घरांची निर्मिती करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ब्रॉडगेज मेट्रो रेल्वे फीडर सेवेकरिता सामंजस्य करार, भांडेवाडी डम्पिंग यार्डमधील कचऱ्यापासून वीज निर्मितीच्या प्रकल्पासह अन्य संबंधित प्रकल्पाच्या भूमिपूजन समारंभात विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात सोमवारी झालेल्या कार्यक्रमात मुख्य अतिथी केंद्रीय रेल्वे, कोळसा व वित्त मंत्री पीयूष गोयल, केंद्रीय भूपृष्ठ रस्ते वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे ऊर्जा व पालकमंत्री चंद्रशेखर बावनमुळे प्रामुख्याने उपस्थित होते.
सर्वोत्तम कोळशामुळे १३५० कोटींची बचत
फडणवीस म्हणाले, वेकोलिच्या कोळशाचा दर्जा सुधारल्यामुळे महाजेनकोला वर्षभरात १३५० कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होऊन विजेचे दर कमी झाले आहेत. कन्वेअर बेल्टने पाच खाणींतून कोळसा थेट वीज प्रकल्पांना मिळणार असल्याने वाहतूक खर्च आणि प्रदूषण कमी होईल. वेस्ट वॉटर धोरणांतर्गत वीज प्रकल्प आणि उद्योगांना पुनर्प्रक्रिया केलेले पाणी मिळेल.
मेट्रोमुळे नागपूर-वर्धा प्रवास ३५ मिनिटात : गडकरी
नितीन गडकरी म्हणाले, ब्रॉडगेज मेट्रो फीडर सर्व्हिस शुरू झाल्यानंतर कमी भाड्यात नागपूर-रामटेक प्रवास केवळ २० मिनिटात आणि नागपूर-वर्धा प्रवास केवळ ३५ मिनिटांत करता येईल. या प्रवासात कन्हान, डुमरी आदी भागातील टाऊनशिप आणि वर्धा, काटोल आदी शहरे सॅटेलाईट शहरे बनतील. आता नागपूरच्या धर्तीवर भोपाळ-बैतुल, भोपाळ-इंदूर, जयपूर-दिल्ली येथे ब्रॉडगेज मेट्रो फीडर सेवा सुरू व्हावी. गडकरी म्हणाले, वेकोलिच्या विविध खाणी आणि महाजेनकोतून निघणारे पाणी शेतकऱ्यांना नि:शुल्क मिळेल. यामुळे विदर्भात १० हजार एकर शेती सिंचनाखाली येईल. यामुळे १० एमएलडी पाणी कोराडी, खापरखेडा येथील वीज प्रकल्पांना मिळणार आहे. पाच खाणीतून पाईप कल्वेअरच्या मदतीने कोराडी आणि खापरखेडा येथील वीज प्रकल्पांना मिळणाऱ्या कोळशाचा वाहतूक खर्च आणि प्रदूषण कमी होण्यासह वीज निर्मितीचा खर्च कमी येईल.