सोनेगाव तलावाचा विसर्ग असलेल्या नाल्यात बांधकाम; नागरिकांत प्रचंड खळबळ

By गणेश हुड | Published: October 26, 2023 02:44 PM2023-10-26T14:44:05+5:302023-10-26T14:46:52+5:30

बिल्डरने थेट नाल्यात बांधकाम सुरू केले आहे. यामुळे नाल्याचा प्रवाह बाधित झाला आहे.

Construction in the drain of Sonegaon Lake; Great excitement among the citizens | सोनेगाव तलावाचा विसर्ग असलेल्या नाल्यात बांधकाम; नागरिकांत प्रचंड खळबळ

सोनेगाव तलावाचा विसर्ग असलेल्या नाल्यात बांधकाम; नागरिकांत प्रचंड खळबळ

नागपूर : २३ सप्टेंबरच्या अतिवृष्टीमुळे अंबाझरी तलावाच्या ओव्हर फ्लो पॉइंट समोरील नागनदी लगतच्या डागा लेआउट, कॉर्पोरेशन कॉलनी यासह इतर वस्त्यांतील घरात पाणी साचल्याने हाहाकार उडाला होता. ही घटना ताजी असतानाच सोनेगाव तलावाचा विसर्ग असलेल्या नाल्यात बांधकाम सुरू आहे. यामुळे नाल्याचा प्रवाह बाधित झाल्याने भविष्यात नाल्यालगतच्या वस्त्यात पुराचे पाणी शिरण्याचा धोका निर्माण झाल्याने नागरिकांत प्रचंड खळबळ उडाली आहे.

बिल्डरने थेट नाल्यात बांधकाम सुरू केले आहे. यामुळे नाल्याचा प्रवाह बाधित झाला आहे. हा नाला लांबवरून वाहत येत असून नाल्याला आजूबाजूच्या परिसरातील सिवरेज जोडलेल्या आहेत. यामुळे नाल्याचा प्रवाह मोठा आहे. सोनेगाव वस्ती, झोपडपट्टी, रेसिडेन्सी पार्क, बांते ले आउट, मुळीक कॉम्प्लेक्स, उज्ज्वल नगरच्या काही भागात पावसाळयाच्या दिवसात पुराचे पाणी शिरते. त्यात या नाल्याच्या मध्यभागी बिल्डरने बांधकाम सुरू केले आहे. त्यामुळे भविष्यात अंबाझरी तलावाच्या ओव्हर फ्लोप्रमाणे मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. या बांधकामाला महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यास प्रशासनाचे दुर्लक्ष कारणीभूत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.

नाल्याच्या एका बाजूला सोमवार वस्ती व झोपडपट्टी आहे तर दुसऱ्या भागात विमानतळ प्राधिकरण सुरक्षा रक्षकांसाठी निवासी संकुल बांधण्यात आले आहे. या नाल्यात बांधकाम झाल्यामुळे हजारो घरांमध्ये पाणी शिरण्याचा धोका निर्माण होणार आहे. याचा विचार करता महापालिका व नासुप्र अधिकाऱ्यांनी नाल्यातील बांधकामावर तात्काळ कारवाई करावी. अशी नागरिकांची मागणी आहे. यासंदर्भात परिसरातील नागरिकांनी महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनकडे तक्रार केली आहे. तक्रारीची दखल घेत झोन प्रशासनाने संबंधित बिल्डरला नाेटीस बजावून जागेच्या मालकीहक्काची कागदपत्रे आठवडाभरात सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

मनपाने बिल्डरला नोटीस बजावली
सोनेगाव तलावाचा विसर्ग असलेल्या नाल्यालगत सुरू असलेल्या बांधकामाची माहिती मिळताच संबंधित बिल्डरला नोटीस बजावण्यात आली आहे. बिल्डरला जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे सात दिवसांत लक्ष्मीनगर झोन कार्यालयाकडे सादर करण्याचे निर्देश दिले आहे. कागदपत्रे तपासून अवैध बांधकाम असल्यास संबंधिताला बांधकाम तोडण्याचे निर्देश दिले जातील. न तोडल्यास महापालिकेकडून कारवाई केली जाईल.
-मिलिंद मेश्राम, सहायक आयुक्त, लक्ष्मीनगर झोन, मनपा

Web Title: Construction in the drain of Sonegaon Lake; Great excitement among the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर