नागपुरातील जामठा स्टेडियमच्या बांधकामाला परवानगीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2018 10:36 AM2018-06-25T10:36:23+5:302018-06-25T10:38:49+5:30
जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए)स्टेडियमच्या बांधकामाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच नसल्याची माहिती समोर आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन (व्हीसीए)स्टेडियमच्या बांधकामाला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिलीच नसल्याची माहिती समोर आली आहे. राज्य माहिती आयोगाला सादर शपथपत्रात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात तसा खुलासा करण्यात आला आहे.असे असताना व्हीसीएने एवढे मोठे बांधकाम केलेच कसे व येथे आंतरराष्ट्रीय सामने कसे खेळविण्यात आले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार व माहिती अधिकार कार्यकर्ते टी. एच.नायडू यांनी याकडे लक्ष वेधत, याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
मौजा जामठा येथे २००८ मध्ये व्हीसीएने स्टेडियम उभारले. मात्र हे स्टेडियम उभारताना महत्त्वाच्या परवानगीच घेण्यात आल्या नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते टी. एच. नायडू यांनी १२ जानेवारी २०१६ मध्ये माहिती अधिकारांतर्गत व्हीसीए स्टेडियमबाबत माहिती मागितली होती. मिळालेल्या माहितीवर समाधान न झाल्याने नायडू यांनी राज्य माहिती आयुक्त यांच्या नागपूर खंडपीठासमोर तक्रार दाखल केली. व्हीसीए स्टेडियमच्या बांधकामाबाबत माहिती उपलब्ध नसेल तर तसे प्रतिज्ञापत्र जिल्हाधिकाºयांनी खंडपीठासमोर सादर करावे. माहिती गहाळ झाली असल्यास महाराष्ट्र अभिलेख अधिनियम २००६ नुसार गुन्हा दाखल करून कार्यवाहीचा अहवाल खंडपीठासमोर सादर करावा, असे आदेश दिले होते. या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी (प्रस्तुतकार) कमलेश हरिचंद्र शेंद्रे यांनी सादर केलेल्या शपथपत्रात स्टेडियमला जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे बांधकाम परवानगी प्रदान करण्यात आली नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. असे असताना जिल्हाधिकारी कार्यालयाने या स्टेडियमकडून मनोरंजन कर कसा वसूल केला व यातून आलेल्या निधीचा उपयोग कुठे केला, असा सवाल प्रशांत पवार यांनी उपस्थित करीत, याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्याचा तसेच आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
या स्टेडियमची क्षमता ४० हजार प्रेक्षकांची आहे. येथे आंतरराष्ट्रीय सामने होतात. स्टेडियमला टाऊन प्लॅनिंग, पर्यावरण, नागपूर सुधार प्रन्यास व अग्निशमन या विभागाकडून परवानगी नाही. स्डेडियम अवैध असल्याने या ठिकाणी सामने भरविणे म्हणजे नागरिकांची सुरक्षा धोक्यात टाकण्यासारखे आहे. प्रसंगी दुर्घटना घडली तर आपद्ग्रस्तांना विम्याचा कुठलाही लाभ मिळणार नाही. त्यामुळे पूर्ण परवानगी मिळेपर्यंत येथे कुठलेही सामने खेळविले जाऊ नये, अशी मागणी करीत याबाबत इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिल(आयसीसी)कडे तक्रार करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.