नागपुरात महामेट्रो रिच-२ च्या बांधकामाला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 10:50 PM2019-05-28T22:50:01+5:302019-05-28T22:51:34+5:30
मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गावरील बांधकाम वेगात पूर्ण होत आहे. वर्धा मार्गावर रिच-१ मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावर रिच-३ येथे लवकरच सुरू करण्याचा महामेट्रोचा मानस आहे. शिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यानच्या मार्गावर कामाने वेग घेतला असून, ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सहा स्टेशन राहणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेट्रो प्रकल्पाच्या चारही मार्गावरील बांधकाम वेगात पूर्ण होत आहे. वर्धा मार्गावर रिच-१ मेट्रो सेवा सुरू झाली असून, हिंगणा मार्गावर रिच-३ येथे लवकरच सुरू करण्याचा महामेट्रोचा मानस आहे. शिवाय सीताबर्डी ते ऑटोमोटिव्ह चौकादरम्यानच्या मार्गावर कामाने वेग घेतला असून, ५० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. ७.२३ कि़मी.च्या या मार्गावर एकूण सहा स्टेशन राहणार आहेत.
या मार्गावर शासकीय कार्यालय, रिझर्व्ह बँक, खासगी व शासकीय बँक, औद्योगिक वसाहत, शासकीय महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय तसेच राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे वाहनचालकांची मोठी गर्दी दिसून येते. याशिवाय राष्ट्रीय महामार्ग असल्याने या मार्गावर जड वाहनांचे आवागमन मोठ्या प्रमाणात होते. यामुळे वाहन चालवताना होणारा त्रास आणि वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणावर मात करण्यासाठी येणाऱ्या काळात मेट्रो फायदेशीर ठरणारच आहे. या ठिकाणी वाहतुकीचे सुयोग्य व्यवस्थापन करून मेट्रोचे कार्य पूर्ण केले जात आहे. बांधकामाला नागरिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
या मार्गावर गड्डीगोदाम चौक ते ऑटोमोटिव्ह चौकापर्यंत मेट्रोच्या बांधकामासोबतच डबल डेकर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाच्या पूर्णत्वानंतर या मार्गावर महत्त्वाचा बदल नागरिकांना दिसून येणार आहे. तसेच गुरुद्वाराजवळील भारतीय रेल्वेच्या पुलावर चार मजली वाहतुकीचे स्थळ बघायला मिळणार आहे. सर्वात खालच्या मजल्यावर रस्ता वाहतूक, पहिल्या मजल्यावर भारतीय रेल्वे, दुसऱ्या मजल्यावर (डबल डेकर) राष्ट्रीय महामार्ग व चौथ्या मजल्यावर नागपूर मेट्रोची वाहतूक होणार आहे.
रिच-२ बांधकामाची वैशिष्ट्ये
- पायलिंग ९६ टक्के
- पाईल कॅप ८५ टक्के
- पिल्लर ७६ टक्के
- सेगमेंट कास्टिंग ३३ टक्के
- मेट्रो स्टेशन ५४ टक्के
- गर्डर लाँचिंगचे कार्य प्रगतिपथावर