मेट्रोच्या मिहान डेपोचे बांधकाम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 12:07 AM2017-10-30T00:07:54+5:302017-10-30T00:08:13+5:30
महामेट्रोच्या मिहान डेपोमध्ये बांधकाम वेगात सुरू असून जवळपास २.५ लाख चौरस फूट जागेवर स्लॅब टाकण्यात आली. मेट्रोच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बांधकाम आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महामेट्रोच्या मिहान डेपोमध्ये बांधकाम वेगात सुरू असून जवळपास २.५ लाख चौरस फूट जागेवर स्लॅब टाकण्यात आली. मेट्रोच्या इतिहासातील हे सर्वात मोठे बांधकाम आहे.
झिरो माईल स्टेशनच्या सर्वात मोठ्या स्लॅबच्या निर्माण कार्यानंतर मिहानच्या मेट्रो रेल्वे डेपोच्या प्रशासकीय इमारतीचे बांधकाम सुरू होणार आहे. जवळपास ९० तासांमध्ये २.५ लाख चौरस फूट फ्लोअरवर स्लॅब टाकण्यात आली. या बांधकामासाठी १५० टन लोखंडाचा उपयोग करण्यात आला. मिहान मुख्य इमारतीचे बांधकाम ३१ मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती मेट्रोच्या मिहान डेपोचे व्यवस्थापक साई शरण दीक्षित यांनी दिली. त्यांनी सांगितले की, मेट्रोचे आतापर्यंतचे सर्वात मोठे बांधकाम आहे. या कार्यात २० ट्रान्झिट मिक्सर आणि तीन पंपांच्या साहाय्याने कॉक्रिट मिक्सरची मदत घेण्यात आली. या कामात जवळपास १०० मजूर, निरीक्षक व अधिकारी दिवसरात्र कार्यरत होते. या इमारतीची किंमत जवळपास ४० कोटी रुपये आहे. मिहान डेपोच्या या मुख्य इमारतीत मेट्रो कारची दुरुस्ती आणि देखभाल करण्यात येणार आहे. पहिल्या माळ्यावर प्रशासकीय कार्यालय राहील. कार्यकारी संचालक (रोलिंग स्टॉक) जनक कुमार गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली बिर्ला शक्ती कॉक्रिट व मिहानच्या चमूसह जनरल कन्सलटंट आणि अधिकारी उपस्थित होते.