मेट्रो - २चे दुसऱ्या टप्प्याचे बांधकाम तीन महिन्यात; निविदा प्रक्रिया लवकरच राबविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2022 11:35 AM2022-12-13T11:35:04+5:302022-12-13T11:38:16+5:30
अध्यादेशाची प्रतीक्षा, डिसेंबर-२०२६ पर्यंत प्रकल्प पूर्ण होणार
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नागपूर दौऱ्याआधी ७ डिसेंबरला ‘मेट्रो-२’ प्रकल्पाला हिरवी झेंडी दाखवित नागपूरकरांना तोहफा दिला. एकूण ६ हजार ७०८ कोटी रुपयांचा प्रकल्प आधीच्या ‘मेट्रो-१’ प्रकल्पाच्या चारही बाजूला ४३.८ किमी लांब राहणार आहे. प्रकल्पाची निविदा लवकर काढण्यात येणार असून प्रत्यक्ष बांधकाम तीन महिन्यात सुरू होणार आहे. दुसरा टप्पा डिसेंबर-२०२६ मध्ये पूर्ण होणार आहे.
महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी निविदा काढण्याची तयारी आधीपासूनच सुरू केली आहे. केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाकडून अध्यादेश आल्यानंतरच प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मेट्रो-१ प्रकल्प प्रत्यक्षात उतरण्यासाठी सात वर्षांपेक्षा जास्त कालावधी लागला. त्यावेळी जमीन अधिग्रहण आणि वाहतूक कोंडीची समस्या मोठी होती. २१ ऑगस्ट २०१५ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणी, ३१ मे २०१६ रोजी अधिकृत भूमिपूजन आणि ११ डिसेंबर २०२२ रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण झाले. दुसऱ्या टप्प्याचे सर्वाधिक बांधकाम महामार्गाच्या मध्यभागी करण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो-२ हा प्रकल्प मेट्रो-१ च्या तुलनेत लवकरच पूर्ण होईल.
अध्यादेश लवकरच येणार
प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात आणि त्याआधी निविदा प्रक्रिया राबविण्यासाठी केंद्रीय नागरी विकास मंत्रालयाचा अध्यादेश महत्त्वाचा असून तो आठवड्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. ६ हजार ७०८ कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी विदेशी संस्थांकडून कर्ज घेण्यात येणार आहे. याकरिता वरिष्ठ स्तरावर संस्थांच्या अधिकाऱ्यांसोबत बोलणी झाली आहे. आधीप्रमाणेच कर्ज प्रत्यक्ष बांधकाम सुरू झाल्यानंतरच मिळणार आहे.
मेट्रो रेल्वे आणि ३२ स्टेशनच्या बांधकामासाठी वेगवेगळ्या निविदा
दुसऱ्या प्रकल्पांतर्गत मेट्रो रेल्वेचे बांधकाम आणि ३२ स्टेशनची उभारणी वेगवेगळ्या कंपन्यांमार्फत करण्यात येणार आहे. याकरिता वेगळी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. खापरी ते बुटीबोरीचे अंतर १८.६ किमी आहे. या मार्गावर १० स्टेशन राहतील. तर ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हानपर्यंतचे अंतर १३ किमी व १२ स्टेशन, प्रजापतीनगर ते कापसी ५.५ किमी व तीन स्टेशन आणि लोकमान्यनगर ते हिंगणा ६.७ किमी अंतर असून या मार्गावर सात स्टेशन राहणार आहेत.