साडेसहा कोटींचे बांधकाम गेले ११ कोटींवर
By Admin | Published: January 11, 2016 02:38 AM2016-01-11T02:38:10+5:302016-01-11T02:38:10+5:30
प्रशासकीय मान्यतेनंतरही रखडले ‘ए विंग’चे कामनागपूर : अतिविशेषोपचार रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेऊन ...
सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल :
प्रशासकीय मान्यतेनंतरही रखडले ‘ए विंग’चे कामनागपूर : अतिविशेषोपचार रुग्णालयातील (सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल) रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेऊन पंतप्रधान आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत ‘ए विंग’चे बांधकाम होणार होते. बांधकामासाठी ६ कोटी ५२ लाख ४ हजार रुपयांच्या प्रस्तावाला प्रशासकीय मान्यता मिळाली, परंतु पाच वर्षांनंतरही बांधकामाला सुरुवात झाली नाही. यामुळे याचा खर्च आता ११ कोटी २१ लाख ७८ हजार ५९५ रुपयांवर गेला आहे.
सुपर स्पेशालिटी रुग्णालयात गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी, न्यूरोलॉजी, न्यूरो सर्जरी, कार्डिओलॉजी, नेफ्रोलॉजी, यूरो सर्जरी व कॉर्डिओथोरॅसीस या सात विभागासोबतच अतिविशेषोपचार पदव्युत्तर अभ्यासक्रम डी.एम. गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी व डी.एम. कार्डिओलॉजी सुरू आहे. याचा फायदा रुग्णांना मिळत असल्याने दिवसेंदिवस रुग्णांची गर्दी वाढत आहे. सद्यस्थितीत सर्वच विभागातील खाटा फुल्ल आहेत. रुग्णांच्या सोयीसाठी २०११ मध्ये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ‘ए विंग’च्या बांधकामाचा प्रस्ताव तयार करण्यात आला. प्रधानमंत्री आरोग्य सुरक्षा योजनेंतर्गत या बांधकामाला प्रशासकीय मंजुरी मिळाली. योजनेच्या २५ कोटी रुपयांमधून या बांधकामासाठी ६ कोटी ५२ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली. परंतु सुरुवातीला सार्वजनिक बांधकाम विभागाने हे बांधकाम वगळण्याचे प्रस्तावित केले. रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. मनीष श्रीगिरीवार यांनी या बांधकामाची गरज शासनाच्या लक्षात आणून दिली. यामुळे नव्याने प्रस्ताव तयार करण्यात आला. भाववाढीमुळे बांधकामाची किंमत ११ कोटींवर गेली. सध्या नवीन प्रस्तावावर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालकाकडून अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. (प्रतिनिधी)
बांधकामामुळे असा होणार होता फायदा
रुग्णालयाच्या पहिल्या माळ्यावर सीव्हीटीएस विभागासाठी अतिदक्षता विभाग व अतिविशेषोपचार पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी सेमिनार हॉल होणार होते. दुसऱ्या माळ्यावर न्यूरो सर्जरी विभागासाठी अतिदक्षता विभाग तर तिसऱ्या माळ्यावर गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजीसाठी वॉर्ड होणार होता. याचा फायदा रुग्णांना होणार होता.
रुग्णालयासाठी ‘ए विंग’बांधकाम अत्यावश्यक
सुपर स्पेशालिटी रुग्णालयासाठी ‘ए विंग’चे बांधकाम फार आवश्यक आहे. सद्यस्थितीत बांधकाम अपूर्ण असल्यामुळे केवळ अर्ध्या जागेत विभाग सुरू आहे. यामुळे अडचणीचे जात आहे. नवा प्रस्ताव शासनकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
- डॉ. मनीष श्रीगिरीवार
विशेष कार्य अधिकारी, सुपर स्पेशालिटी रुग्णालय