ट्रॉमाचे बांधकाम मनपाच्या परवानगीविनाच
By admin | Published: May 27, 2016 02:41 AM2016-05-27T02:41:54+5:302016-05-27T02:41:54+5:30
उद्घाटनाच्या तारखेला घेऊन मेडिकलचा ड्रीम प्रोजेक्ट ‘ट्रॉमा केअर सेंटर’ अडचणीत सापडला असताना महापालिकेच्या परवानगीविनाच याचे बांधकाम झाल्याचे समोर आले आहे.
नागपूर : उद्घाटनाच्या तारखेला घेऊन मेडिकलचा ड्रीम प्रोजेक्ट ‘ट्रॉमा केअर सेंटर’ अडचणीत सापडला असताना महापालिकेच्या परवानगीविनाच याचे बांधकाम झाल्याचे समोर आले आहे. मेडिकल प्रशासनाला आवश्यक दस्तावेज गोळा करण्यासाठी गुरुवारी धावाधाव करावी लागली. ट्रॉमा केअर सेंटरचे उद्घाटन २७ मे रोजी होणार होते. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या दिवशी अनेक कार्यक्रम शहरात आहेत. यामुळे तारीख बदलविण्यासाठी स्थानिक नेत्यांनी सूचना केल्या आहेत. याला घेऊन मेडिकल प्रशासनाची दमछाक सुरू असताना मंगळवारी मंत्रालयातून धडकलेल्या एका पत्रामुळे गोंधळ उडाला. प्रशासनाने गुरुवारी तडकाफडकी मनपा आणि नझूल कार्यालयात ठाण मांडून कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. शहरात कोणत्याही स्वरूपाचे बांधकाम करायचे असेल तर त्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थेची परवानगी घेणे गरजेचे असते. सरकारची मालकी असलेल्या सार्वजनिक वापराच्या इमारतीदेखील त्याला अपवाद नसतात. मनपाच्या परवानगीशिवाय बांधकामाचा कोणताही नकाशा मंजूर केला जात नाही. असे असतानाही मेडिकल प्रशासनाने तब्बल पाच वर्षांपासून ट्रॉमाच्या इमारतीसाठी मनपा, अग्निशमन विभागाची कोणतीही परवानगी घेतलेली नसल्याची बाब समोर आली. मेडिकलचे तत्कालीन अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार यांच्या कार्यकाळात प्रस्ताव पाठविण्यात आला होता. (प्रतिनिधी)