बांधकाम कामगाराची दगडाने ठेचून हत्या; बुटीबाेरी एमआयडीसी परिसरातील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2022 02:50 PM2022-07-01T14:50:31+5:302022-07-01T14:54:51+5:30
बुटीबाेरी-टाकळघाट मार्गावरील उमरी परिसरात इंडोरामा कंपनीचे गेट क्रमांक-७ आहे. कामगारांना याच परिसरातील नालीत तरुणाचा मृतदेह आढळून आला.
टाकळघाट (नागपूर) : एमआयडीसी बुटीबोरी परिसरातील बुटीबाेरी-टाकळघाट मार्गावरील उमरी शिवारातील नालीत गुरुवारी (दि. ३०) पहाटे तरुणाचा मृतदेह आढळून आला. ताे बांधकाम कामगार असून, त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.
आकाश रमेश फेंडर (२२, रा. घारफळ, ता. बाभूळगाव, जिल्हा यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. आकाश हा बांधकाम कामगार असून, ताे मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवासी असला तरी मागील काही दिवसांपासून गणेशपूर, ता. हिंगणा येथे राहायचा. बुटीबाेरी-टाकळघाट मार्गावरील उमरी परिसरात इंडोरामा कंपनीचे गेट क्रमांक-७ आहे. कामगारांना याच परिसरातील नालीत पहाटे तरुणाचा मृतदेह आढळून आल्याने त्यांनी पाेलिसांना सूचना दिली.
माहिती मिळताच पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. शरीरावरील जखमा पाहता त्याचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. त्याच्या हातावर गाेंदलेले ‘आकाश’ हे नाव आणि त्याच्या खिशातील कागदावर नमूद आलेल्या माेबाईल क्रमांकावरून काही वेळात त्याची ओळखही पटली. पाेलिसांनी मृतदेह ताब्यात घेत नागपूर शहरातील मेडिकल हाॅस्पिटलमध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. याप्रकरणी एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध खुनाच्या गुन्ह्याची नाेंद केली असून, या घटनेचा तपास ठाणेदार अशाेक काेळी करीत आहेत.
खुनाचे कारण अस्पष्ट
आराेपीने दगडाने वार करून आकाशचा चेहरा विद्रुप केला. त्याच्या शरीरावर दगडाने वार केल्याने खाेल जखमाही आढळून आल्या. आकाशचा खून नेमका कुणी आणि कशासाठी केला, हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. ताे या भागातील बांधकामांवर कामगार म्हणून काम करायचा आणि गणेशपूर येथे किरायाने राहायचा. त्यामुळे त्याच्या खुनाचे कारण शाेधून काढत आराेपीपर्यंत पाेहाेचण्याचे एमआयडीसी बुटीबाेरी पाेलिसांसमाेर आव्हान आहे.