विश्व इन्फ्रास्ट्रक्चरला ग्राहक आयोगाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 9, 2021 04:06 AM2021-07-09T04:06:54+5:302021-07-09T04:06:54+5:30
नागपूर : ग्राहकासोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे विश्व इन्फ्रास्ट्रक्चरला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका बसला. ग्राहकास ...
नागपूर : ग्राहकासोबत अनुचित व्यापार पद्धतीचा अवलंब केल्यामुळे विश्व इन्फ्रास्ट्रक्चरला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचा दणका बसला. ग्राहकास २ लाख रुपये १८ टक्के व्याजासह अदा करण्याचा आदेश आयोगाने विश्व इन्फ्रास्ट्रक्चरला दिला. तसेच, ग्राहकास शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २० हजार आणि तक्रार खर्चापोटी १० हजार रुपये भरपाईही मंजूर केली. ही रक्कम विश्व इन्फ्रास्ट्रक्चरनेच द्यायची आहे.
व्याज ३० ऑक्टोबर २०१९ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी विश्व इन्फ्रास्ट्रक्चरला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मनीष म्हसकर असे ग्राहकाचे नाव असून ते मानेवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवर आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांच्या पीठाने हा निर्णय दिला. तक्रारीतील माहितीनुसार, म्हसकर यांनी विश्व इन्फ्रास्ट्रक्चरच्या मौजा कच्छीमेट, ता. उमरेड येथील ले-आऊटमधील एक भूखंड १ लाख ९१ हजार ३०० रुपयात खरेदी करण्यासाठी करार केला. त्यानंतर विश्व इन्फ्रास्ट्रक्चर २७ डिसेंबर २०१८ पर्यंत वेळोवेळी एकूण १ लाख ६० हजार रुपये दिले. दरम्यान, त्यांनी भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून मागितले असता, विश्व इन्फ्रास्ट्रक्चरने टाळाटाळ केली. तसेच, संबंधित जमीन येनूबाई अंबाडरे यांना विकली. त्यामुळे म्हसकर यांनी रक्कम व्याजासह परत मागितली असता, विश्व इन्फ्रास्ट्रक्चरने २ लाख रुपये देण्याचे मान्य करून त्यांना १ लाख ६० हजार रुपयाचा धनादेश दिला, पण तो धनादेश पुरेशा रकमेअभावी अनादरित झाला. पुढे म्हसकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली असता, विश्व इन्फ्रास्ट्रक्चरने त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचे दोन धनादेश दिले. ते धनादेशही परत आले. परिणामी, म्हसकर यांनी ग्राहक आयोगात तक्रार दाखल केली होती.