ग्राहक आयोग : नागपूर सहारा प्राईम सिटी कंपनीला चपराक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 09:24 PM2019-01-11T21:24:37+5:302019-01-11T21:26:55+5:30
सहारा प्राईम सिटी कंपनीला महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठामध्ये जोरदार चपराक बसली. आयोगाने १७ तक्रारकर्त्या ग्राहकांचे पैसे १८ टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश कंपनीला दिला. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता प्रत्येकी ५ लाख व तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही कंपनीने द्यायचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सहारा प्राईम सिटी कंपनीला महाराष्ट्र ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या नागपूर खंडपीठामध्ये जोरदार चपराक बसली. आयोगाने १७ तक्रारकर्त्या ग्राहकांचे पैसे १८ टक्के व्याजाने परत करण्याचा आदेश कंपनीला दिला. तसेच, ग्राहकांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता प्रत्येकी ५ लाख व तक्रारीच्या खर्चापोटी प्रत्येकी १० हजार रुपये भरपाई मंजूर केली. ही रक्कमही कंपनीने द्यायचे आहे.
खंडपीठाचे पीठासीन सदस्य बी. ए. शेख व सदस्य जयश्री येंगल यांनी नुकताच हा निर्णय दिला. तक्रारकर्त्या ग्राहकांनी कंपनीच्या वर्धा रोडवरील गृहयोजनेतील सदनिका खरेदी केल्या आहेत. त्यांनी २००८ पासून कंपनीला २५ ते ४० लाख रुपयांपर्यंतची रक्कम अदा केली. परंतु, कंपनीने करारामध्ये निर्धारित झालेल्या कालावधीत योजना पूर्ण करून ग्राहकांना सदनिकांचा ताबा दिला नाही. योजनेतील इमारती अर्धवट बांधून पडल्या आहेत. योजनेच्या ठिकाणी आवश्यक पायाभूत सुविधाही उपलब्ध करून देण्यात आलेल्या नाहीत. ग्राहकांनी त्यांच्या जीवनभराची कमाई कंपनीला दिली आहे. तसेच, काही ग्राहकांनी बँकेतून कर्ज काढून सदनिकेची किंमत अदा केली आहे. योजनेचे काम रखडल्यामुळे सर्व ग्राहकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. सुरुवातील ग्राहकांनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावून योजना पूर्ण करून सदनिकांचा ताबा देण्याची मागणी केली होती. परंतु, कंपनीने त्यांना दिलासा दिला नाही. परिणामी, विजय अडतिया व इतर १६ ग्राहकांनी आयोगाचे दार ठोठावले होते. ग्राहकांतर्फे अॅड. नलिन मजिठिया व अॅड. तृप्ती महेंद्रकर यांनी कामकाज पाहिले.