कार्बन मोबाईल्सला ग्राहक मंचचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 11:15 PM2018-04-18T23:15:25+5:302018-04-18T23:15:36+5:30
जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात कार्बन मोबाईल्स कंपनीला दणका दिला आहे. कंपनी व इतर प्रतिवादींनी पीडित महिला ग्राहकाला मोबाईलची किंमत व्याजासह परत करावी, असा आदेश देण्यात आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात कार्बन मोबाईल्स कंपनीला दणका दिला आहे. कंपनी व इतर प्रतिवादींनी पीडित महिला ग्राहकाला मोबाईलची किंमत व्याजासह परत करावी, असा आदेश देण्यात आला आहे.
मंचचे अध्यक्ष विजय प्रेमचंदानी व सदस्य नितीन घरडे यांनी प्रकरणावर निर्णय दिला. स्मिता नारनवरे असे ग्राहकाचे नाव असून, त्या गोंडवानानगर येथील रहिवासी आहेत. त्यांना सदोष मोबाईल विकण्यात आला होता. त्यानंतर कंपनीकडून आवश्यक सहकार्य मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. कंपनी व इतरांनी नारनवरे यांना मोबाईलचे ४ हजार ५० रुपये १२ टक्के व्याजासह परत करावेत, असा आदेश मंचने दिला आहे. व्याज १३ आॅगस्ट २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करेपर्यंतच्या कालावधीत लागू होणार आहे. याशिवाय नारनवरे यांना मानसिक व शारीरिक त्रासापोटी तीन हजार तर, तक्रारीच्या खर्चापोटी १५०० रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
नारनवरे यांनी १५ जून २०१६ रोजी सीताबर्डीतील मोबाईल व्हिल्ला येथून कार्बन कंपनीचा मोबाईल खरेदी केला होता. १० आॅगस्ट रोजी मोबाईलची बॅटरी अचानक कमी झाली. त्यानंतर मोबाईल सुरू होत नव्हता. परिणामी, त्यांनी कंपनीला मोबाईल दुरुस्त करून मागितला. मोबाईल ओम इलेक्ट्रॉनिक्सकडे दुरुस्तीकरिता पाठविण्यात आला. ओम इलेक्ट्रॉनिक्सने त्यांना मोबाईल वॉरंटी काळात बसत नसल्याचे व मोबाईल दुरुस्तीसाठी खर्च लागेल, असे सांगितले. त्यानंतर नारनवरे यांनी कंपनीकडे तक्रारी केल्या, पण त्याची दखल घेण्यात आली नाही. शेवटी त्यांनी ग्राहक मंचात धाव घेतली.