ग्राहक मंचचा आदेश : तक्रारकर्त्याला १३ लाख रुपये अदा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 10:12 PM2019-04-18T22:12:09+5:302019-04-18T22:13:56+5:30
तक्रारकर्त्याला विविध कारणांसाठी एकूण १३ लाख रुपये अदा करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सदरमधील शांतीमोहन हॉस्पिटल, हॉस्पिटलमधील चिकित्सक डॉ. संजय जैन, डॉ. वाय. आर. जैन व डॉ. वाय. बालसुब्रमण्यम यांना दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : तक्रारकर्त्याला विविध कारणांसाठी एकूण १३ लाख रुपये अदा करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सदरमधील शांतीमोहन हॉस्पिटल, हॉस्पिटलमधील चिकित्सक डॉ. संजय जैन, डॉ. वाय. आर. जैन व डॉ. वाय. बालसुब्रमण्यम यांना दिला आहे.
सुरेश मिश्रा असे तक्रारकर्त्याचे नाव असून ते दोसर चौक येथील रहिवासी आहेत. १३ लाख रुपयांमध्ये उपचार खर्चाचे २ लाख ७० हजार रुपये, नुकसान भरपाईचे १० लाख रुपये व तक्रार खर्चाचे ३० हजार रुपयांचा समावेश आहे. तसेच, उपचार खर्च रकमेवर ५ जून २००८ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत १० टक्के व्याज लागू करण्यात आले आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी नुकताच हा निर्णय दिला.
तक्रारीतील माहितीनुसार, मिश्रा यांची मुलगी पायल हिला पोट दुखण्याचा व इतर त्रास होता. त्यामुळे तिला ९ जून २००७ रोजी शांतीमोहन हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी भरती करण्यात आले. डॉक्टरांनी क्षयरोगाचे उपचार सुरू केले, पण पायलच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यानंतर आवश्यक चाचण्या केल्या असता पायलला क्षयरोग नसल्याचे आढळून आले. तेव्हापर्यंत पायलची प्रकृती प्रचंड खालावली होती. त्यामुळे तिला १४ जून रोजी केयर हॉस्पिटलमध्ये स्थानांतरित करण्यात आले. त्या ठिकाणी तिला कार्डियाक एनसेफेलॉपॅथी आजार असल्याचे निदान करण्यात आले. परंतु, ती वाचू शकली नाही. शांतीमोहन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी चुकीचे रोगनिदान व उपचार केल्यामुळे पायलचा मृत्यू झाला. उपचारावर लाखो रुपये खर्च करूनही काहीच फायदा झाला नाही असा तक्रारकर्त्याचा आरोप होता. पायल बिरला सन लाईफ इन्शुरन्समध्ये वार्षिक २ लाख १० हजार ९६० रुपये पॅकेजवर काम करीत होती.
अकरा वर्षानंतर आला निर्णय
मिश्रा यांनी यासंदर्भात जून-२००८ मध्ये तक्रार दाखल केली होती. त्यावर ११ वर्षानंतर निर्णय देण्यात आला. मंचने नोटीस बजावल्यानंतर हॉस्पिटल व संबंधित चिकित्सकांनी सविस्तर लेखी उत्तर दाखल करून तक्रारकर्त्याचे सर्व आरोप फेटाळून लावले होते व तक्रार खारीज करण्याची मागणी केली होती. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकल्यानंतर मंचने मिश्रा यांची तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला.