ग्राहक मंचचा आदेश : विम्याचे १.४७ लाख रुपये १२ टक्के व्याजासह अदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2019 08:21 PM2019-10-31T20:21:04+5:302019-10-31T20:22:19+5:30

तक्रारकर्त्या ग्राहकाला विम्याचे १ लाख ४७ हजार २२० रुपये १२ टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे.

Consumer Forum Order: Pay Rs 1.47 lakh with 12% interest | ग्राहक मंचचा आदेश : विम्याचे १.४७ लाख रुपये १२ टक्के व्याजासह अदा करा

ग्राहक मंचचा आदेश : विम्याचे १.४७ लाख रुपये १२ टक्के व्याजासह अदा करा

Next
ठळक मुद्देश्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला चपराक

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाला विम्याचे १ लाख ४७ हजार २२० रुपये १२ टक्के व्याजासह अदा करण्यात यावे, असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीला दिला आहे. व्याज २५ जून २०१४ ते प्रत्यक्ष विमा रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासापोटी २० हजार व तक्रार खर्चापोटी ५ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली आहे. ही रक्कमही कंपनीने द्यायची आहे.
विनोद बालचंद्र कनोजी असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून, ते गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांच्या तक्रारीवर मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी हा निर्णय दिला. निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याचा वेळ देण्यात आला आहे. या निर्णयामुळे कंपनीला चपराक बसली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, कनोजी यांच्याकडे टाटा-२०७ हे चारचाकी वाहन आहे. त्यांनी श्रीराम जनरल इन्शुरन्स कंपनीकडून या वाहनाचा विमा काढला होता. विम्याची मुदत २८ नोव्हेंबर २०१३ ते २७ नोव्हेंबर २०१४ पर्यंत होती. २० जानेवारी २०१४ रोजी ते वाहन प्रवासादरम्यान जळाले. कनोजी यांनी तिरोडा पोलिसांना ताबडतोब त्या अपघाताची माहिती दिली. पोलिसांनी दुसऱ्या दिवशी घटनास्थळाचा पंचनामा केला. दरम्यान, कनोजी यांनी नुकसान भरपाईसाठी कंपनीकडे दावा दाखल केला. तो दावा कंपनीने विविध कारणांनी नामंजूर केला. त्यामुळे कनोजी यांनी कंपनीला नोटीस पाठवली. कंपनीने त्याला प्रतिसाद दिला नाही. परिणामी, कनोजी यांनी मंचमध्ये धाव घेतली होती. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर दाखल करून स्वत:ची बाजू स्पष्ट केली व तक्रार खारीज करण्याची विनंती केली. शेवटी मंचने हा निर्णय दिला.

कंपनीचा युक्तिवाद अमान्य
तक्रारकर्त्याचे वाहन वापरलेले (सेकंड हॅन्ड) होते. वाहनाचे बहुतांश पार्टस् गहाळ झाले होते. वाहनाची बॅटरी चालकाच्या उजव्या बाजूला लावण्यात आली होती. त्यामुळे बॅटरी मोटरच्या व सेल्फ इग्निशनच्या संपर्कात आल्यामुळे शॉर्ट सर्किट होऊन गाडी जळाली. परिणामी, विमा दावा नाकारला असा युक्तिवाद कंपनीने केला होता. मंचने तो युक्तिवाद तथ्यहीन ठरवला आणि अशा मुद्यांवरून तक्रारकर्त्याचा विमा दावा नाकारणे ही कंपनीच्या सेवेतील त्रुटी आहे, असे मत व्यक्त केले.

Web Title: Consumer Forum Order: Pay Rs 1.47 lakh with 12% interest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.