ग्राहक मंचचा निर्णय : नागपुरातील युनिव्हर्सल रिअल इन्फ्राच्या प्रवीण तोतलवारला कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 10:34 PM2020-03-18T22:34:31+5:302020-03-18T22:36:03+5:30

आदेशाच्या अवमाननेचा आरोप सिद्ध झाल्यामुळे युनिव्हर्सल रिअल इन्फ्राचा प्रोप्रायटर प्रवीण तोतलवार याला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.

Consumer Forum's decision: Universal Real Infra in Nagpur Pravin Totalwar imprisoned | ग्राहक मंचचा निर्णय : नागपुरातील युनिव्हर्सल रिअल इन्फ्राच्या प्रवीण तोतलवारला कारावास

ग्राहक मंचचा निर्णय : नागपुरातील युनिव्हर्सल रिअल इन्फ्राच्या प्रवीण तोतलवारला कारावास

Next
ठळक मुद्देआदेशाच्या अवमाननेचा आरोप सिद्ध

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आदेशाच्या अवमाननेचा आरोप सिद्ध झाल्यामुळे युनिव्हर्सल रिअल इन्फ्राचा प्रोप्रायटर प्रवीण तोतलवार याला अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने ३ वर्षे कारावास व १० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली.
पीठासीन सदस्या स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. ग्राहक अजयसिंग ठाकूर यांनी तोतलवारविरुद्ध ग्राहक संरक्षण कायद्यातील कलम २७ अंतर्गत दरखास्त अर्ज दाखल केला होता. तोतलवारने कारावासाच्या मुदतीत आदेशाचे पालन केल्यास त्याला उर्वरित कारावासातून मुक्त करण्यात यावे, असे मंचने निर्णयात स्पष्ट केले आहे. परंतु, त्याला दंडाच्या शिक्षेतून सूट मिळणार नाही. तसेच, ठाकूर यांना दरखास्त खर्चापोटी ५ हजार रुपये द्यावे, असा आदेश तोतलवारला देण्यात आला आहे.
मंचने १० मे २०१८ रोजी ठाकूर यांची तक्रार अंशत: मंजूर करून तोतलवारला विविध आदेश दिले होते. १४ एप्रिल २०१२ रोजीच्या करारानुसार, ठाकूर यांना त्यांनी खरेदी केलेल्या भूखंडाचे उर्वरित रक्कम स्वीकारून विक्रीपत्र नोंदवून द्यावे, भूखंडाचे मोजमाप करून लेखी ताबापत्र ठाकूर यांना द्यावे, काही कायदेशीर व तांत्रिक कारणामुळे विक्रीपत्र नोंदवून देणे शक्य नसल्यास ठाकूर यांचे ५ लाख ३६ हजार रुपये १८ टक्के व्याजासह (२४ डिसेंबर २०१२ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत) परत करण्यात यावेत, ठाकूर यांना शारीरिक-मानसिक त्रासाकरिता २५ हजार व तक्रार खर्चापोटी ५ हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असे ते आदेश होते.
या आदेशांच्या अंमलबजावणीसाठी तोतलवारला एक महिन्याचा वेळ देण्यात आला होता. ठाकूर यांनी ४ जून २०१८ रोजी तोतलवारला कायदेशीर नोटीस बजावून आदेशाचे पालन करण्यास सांगितले होते. परंतु, तोतलवारने मंचच्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे ठाकूर यांनी दरखास्त अर्ज दाखल केला होता. मंचची नोटीस तामील झाल्यानंतर तोतलवारने लेखी बयाण दाखल करून गुन्हा नाकबूल केला व स्वत:च्या समर्थनार्थ विविध मुद्दे मांडले. शेवटी मंचने विविध बाबी लक्षात घेता तोतलवारला आदेशाच्या अवमाननेसाठी दोषी ठरवून संबंधित शिक्षा सुनावली.
ठाकूर यांनी युनिव्हर्सल रिअल इन्फ्राच्या मौजा डेगमा (बु.), ता. हिंगणा येथील ले-आऊट (प.ह. क्र-६४, ख.क्र.-१५०/२-ब) मधील दोन भूखंड ६ लाख ३७ हजार ९८६ रुपयांत खरेदी केले व कंपनीला वेळोवेळी एकूण ५ लाख ३६ हजार रुपये अदा केले. त्यानंतर उर्वरित रक्कम घेऊन भूखंडांचे विक्रीपत्र करून देण्याची कंपनीला विनंती केली. परंतु, कंपनीने त्यांना प्रतिसाद दिला नाही. परिणामी, त्यांनी मंचमध्ये धाव घेतली होती.

बेकायदेशीर कृतीला जरब बसणे आवश्यक
या प्रकरणात तोतलवारची वर्तणूक अत्यंत आक्षेपार्ह आहे. त्याने मंचाच्या आदेशाची हेतुपुरस्सर अवहेलना केल्याचे पुराव्यांवरून स्पष्ट होते. एकंदरीत वर्तणूक पाहता तो कुठलीही सहानुभूती मिळण्यास पात्र नाही. अशा प्रकारच्या व्यक्तीस केवळ दंडाची शिक्षा न देता जरब बसेल अशी तुरुंगवास व दंड या दोन्ही शिक्षा देण्याची गरज आहे. त्यामुळे भविष्यात तत्सम प्रवृत्तीकडून ग्राहकाची फसवणूक व मंचाच्या आदेशाची अवहेलना टाळली जाईल. त्यातून नागरिकांचा कायद्यांवर व कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या व्यवस्थेवरील विश्वास वृद्धिंगत होईल असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

 

Web Title: Consumer Forum's decision: Universal Real Infra in Nagpur Pravin Totalwar imprisoned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.