ग्राहक मंच : मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला चपराक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 08:12 PM2019-09-10T20:12:25+5:302019-09-10T20:14:58+5:30

जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला जोरदार चपराक बसली.

Consumer Forums: Make My Trip India Company slapped | ग्राहक मंच : मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला चपराक

ग्राहक मंच : मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला चपराक

Next
ठळक मुद्देतक्रारकर्त्याला ९० हजार रुपये भरपाई मंजूर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एका प्रकरणात तक्रारकर्त्या ग्राहकाच्या हिताचे विविध आदेश जारी केल्यामुळे मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला जोरदार चपराक बसली.
विजय बजाज असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव आहे. बजाज यांना २५ हजार ७३६ रुपये १२ टक्के व्याजासह परत करण्यात यावे व ९० हजार रुपये भरपाई अदा करण्यात यावी असे आदेश मंचने मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला दिले आहेत. व्याज ३ जून २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले आहे. भरपाईमध्ये शारीरिक-मानसिक त्रासाचे ८० हजार व तक्रार खर्चाचे १० हजार रुपयाचा समावेश आहे. मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य चंद्रिका बैस व सुभाष आजणे यांनी प्रकरणावर निर्णय दिला. आदेशांवर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे.
तक्रारीतील माहितीनुसार, बजाज यांनी स्वत:सह पत्नी, मुलगा, मुलगी व पुतण्या यांचे नागपूर येथून इंग्लंडला जाण्याकरिता आणि तेथून स्कॉटलंडमध्ये जाऊन दोन दिवस व दोन रात्र राहण्याकरीता मेक माय ट्रिप इंडिया कंपनीला ४९ हजार ६३५ रुपये अदा केले होते. बजाज यांच्याकरिता स्कॉटलंड येथे हॉटेल आरक्षित करण्यात आले होते. त्यांना इंग्लंडपर्यंतच्या प्रवासात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवली नाही. परंतु, २८ मे २०१६ रोजी स्कॉटलंडकडे प्रस्थान केल्यानंतर हॉटेलचे आरक्षण रद्द झाल्याचे कळविण्यात आले. त्यानंतर कंपनीने दुसऱ्या हॉटेलमधील केवळ एका खोलीत राहण्याची पर्यायी व्यवस्था केली. त्या ठिकाणी आवश्यक सुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच, त्यांना खोली रिकामी होण्यासाठी सहा तास प्रतीक्षा करावी लागली व अतिरिक्त ३८ हजार रुपयेही भरावे लागले. त्याचा सर्वांना प्रचंड शारीरिक व मानसिक त्रास झाला. परिणामी, बजाज यांनी ३ सप्टेंबर २०१६ रोजी कंपनीला कायदेशीर नोटीस पाठवून ४९ हजार ६३५ रुपये परत मागितले. परंतु, कंपनीने केवळ २३ हजार ८९९ रुपयेच परत केले. करिता बजाज यांनी मंचमध्ये धाव घेतली होती.
मंचने नोटीस बजावल्यानंतर कंपनीने लेखी उत्तर दाखल करून त्यांची काहीच चूक नसल्याचा दावा केला व बजाज यांची तक्रार खारीज करण्याची मागणी केली. अंतिम सुनावणीनंतर मंचने रेकॉर्डवरील विविध पुरावे लक्षात घेता तक्रार अंशत: मंजूर करून वरीलप्रमाणे आदेश दिले.
मनस्ताप सहन करावा लागला
कंपनीच्या चुकीमुळे तक्रारकर्त्यास अपरिचित ठिकाणी मनस्ताप सहन करावा लागला. तक्रारकर्त्याची अत्यंत गैरसोय झाली. त्याचप्रमाणे तक्रारकर्त्याला आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. त्यामुळे ते आवश्यक दिलासा मिळण्यास पात्र आहेत असे निरीक्षण मंचने निर्णयात नोंदवले.

 

Web Title: Consumer Forums: Make My Trip India Company slapped

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.