ग्राहकाला मनोरंजनापासून वंचित ठेवले; सिटी केबलला ग्राहक आयोगाचा दणका; मोजावे लागणार १० हजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2022 05:43 PM2022-04-22T17:43:02+5:302022-04-22T17:53:53+5:30
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नेटवर्कला ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
नागपूर : एका ग्राहकास मनोरंजनापासून वंचित ठेवल्यामुळे सिटी केबल नेटवर्कला दणका बसला आहे. पीडित ग्राहकास दहा हजार रुपये भरपाई अदा करा, असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने नेटवर्कला दिला आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी नेटवर्कला ४५ दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
रमेश लाढवे असे ग्राहकाचे नाव असून ते नवीन स्नेहनगर, वर्धा रोड येथील रहिवासी आहेत. त्यांना आयोगाचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य स्मिता चांदेकर व अविनाश प्रभुणे यांच्या न्यायपीठाने दिलासा दिला. लाढवे यांनी २ नोव्हेंबर २०१८ पासून सिटी केबल नेटवर्कची सेवा सुरू केली होती. जानेवारी-२०१९ पर्यंतचे बिलही अदा केले होते; परंतु १३ फेब्रुवारी २०१९ पासून त्यांच्या कनेक्शनवर केवळ 'फ्री टू एयर' चॅनलचे प्रक्षेपण सुरू ठेवण्यात आले. त्यामुळे त्यांनी नेटवर्ककडे तक्रार केली; पण त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नाही.
त्यानंतर त्यांच्या कनेक्शनवरील सर्व चॅनल्सचे प्रक्षेपण बंद करण्यात आले. दरम्यान, त्यांना १३ फेब्रुवारी ते ३१ मार्च २०१९ पर्यंत मनोरंजनापासून वंचित राहावे लागले. करिता, त्यांनी आयोगात तक्रार दाखल केली होती. आयोगाने अंतिम सुनावणीनंतर तक्रार अंशत: मंजूर करून हा निर्णय दिला. नेटवर्कने नियमांचे पालन केले नाही, असा निष्कर्ष हा निर्णय देताना नोंदविण्यात आला.