सोने तारण ठेवण्याकडे ग्राहकांचा वाढतोय कल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 09:48 PM2020-07-04T21:48:00+5:302020-07-04T21:48:20+5:30
हातचे सोने न मोडता तारण ठेवून कुटुंबाच्या गरजा भागविण्याकडे लोकांचा कल वाढत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोना लॉकडाऊनमुळे सर्व देशांच्या अर्थव्यवस्थेची गती मंदावली असून गुंतवणुकीवरही परिणाम झाला आहे तर दुसरीकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. इतर गुंतवणूक कमी होत असताना सोन्यात गुंतवणूक वाढत आहे. यासोबतच हातचे सोने न मोडता तारण ठेवून कुटुंबाच्या गरजा भागविण्याकडे लोकांचा कल वाढत आहे. याशिवाय बँकांकडून सुवर्ण तारण योजनांचे व्याजदर कमी करून ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्नदेखील केला जात आहे. यामुळे या योजनांकडे शेतकऱ्यांसह आता नोकरदारही वळत असल्याचे दिसून येत आहे.
नोकरदार व शेतकऱ्यांना फायदा
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या हातचे काम थांबून नोकरदारांच्या वेतनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. बँकांचे कर्ज आणि त्यावरील व्याजाचे हप्ते थांबले आहेत. याशिवाय शेतकी माल न विकल्याने शेतकरीही आर्थिक संकटात आहेत. ग्रामीण भागात बँका आणि जिल्हा बँकेकडून कर्ज मिळण्यास उशीर झाला आहे. त्यामुळे शेतकरी घरचे सोने तारण ठेवून मिळणाºया पैशातून शेतीची मशागत आणि पेरणीचे कामे करीत आहेत. शेतीतील माल विकून पुन्हा तारण सोडविणे, या प्रक्रियेचा अवलंब आता शेतकरी अनेक वर्षांपासून करीत आहेत. पूर्वी शेतकरी हातचे सोने विकून पैसा उभारायचा, पण आता मोडपेक्षा तारणाकडे कल वाढला आहे. सोने मोडण्यापेक्षा त्यात आलेल्या घटपेक्षा तारणावरील व्याज अधिक परवडणारे असल्याने शेतकरी हातचे सोने मोडत नाही, असे सूत्रांनी सांगितले.
वाढत्या भावामुळे सोने मोडण्याऐवजी तारणाला पसंती
सोन्याचे भाव वाढत असताना ग्राहकाचा सोने मोडण्यापेक्षा खरेदी करण्याकडे कल जास्त आहे. त्यातच भाव जास्त असतानाही सराफांच्या विविध योजनांतर्गत पैसा गुंतवून ग्राहक सोने खरेदी करीत आहे. ग्राहक योजनांचा पुरेपूर फायदा घेत असल्याचे सराफांनी सांगितले. सराफांपेक्षा बँकांमध्ये सोने गहाण ठेवण्याकडे ग्राहकांचा जास्त कल आहे. राष्ट्रीयकृत आणि सहकारी बँकांनाही सोने तारण योजना सुरू करीत व्याजदर घटविले आहेत. खासगी सावकरांच्या तुलनेत बँकांचे वार्षिक व्याजदर ७.५० ते ८.२५ टक्के आहेत.
सोन्याच्या वाढत्या भावामुळे तारण वाढले
लॉकडाऊनच्या काळात सोन्याचे भाव जवळपास १० ग्रॅममागे १३ हजारांनी वाढले आहेत. जवळील सोने मोडले तर ते पुन्हा खरेदी करणे शक्य नाही, अशी भावना लोकांमध्ये असल्याने आवश्यकतेवेळी सोने तारण ठेवून पैसा उभारण्याकडे लोकांची पसंती आहे. नोकरदारांचीही आर्थिक घडी विस्कटली आहे. त्यामुळे विविध गरजांसाठी बचत व गुंतवणूक म्हणून हाती असलेल्या सोन्याचा वापर करण्याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय नाही. लॉकडाऊनच्या संकटातून सावरण्यासाठी सोन्यातील गुंतवणूक सुरक्षित राहून सहज कर्जही उपलब्ध होत आहे.
लॉकडाऊनमुळे लोकांना आर्थिक टंचाई जाणवत असून, गरजा पूर्ण करण्यासाठी सोने गुंतवणुकीचे सुरक्षित माध्यम आहे. गरजेपोटी लोक सोने तारण ठेवण्यासाठी बँकेत येत आहेत. सोनाराने प्रमाणित केल्यानंतर आणि कागदपत्रे जमा केल्यानंतर ग्राहकांच्या खात्यात १० मिनिटात पैसे वळते केले जातात.
विलास पराते, झोनल मॅनेजर, बँक आॅफ इंडिया.
सोन्याचे भाव वाढत आहेत. बँकेची सोने तारण योजना आहे. सोने गहाण ठेवून ग्राहकांनी पैसे न्यावे, असे अपेक्षित आहे. त्याकरिता शाखांना प्रोत्साहन देण्यात येत आहे. नवीन माणूसही केवायसी आणून सोने तारण ठेवू शकतो. लोक अजूनही लॉकडाऊनमधून बाहेर पडलेले नाहीत.
मनोज कारे, उपमहाव्यवस्थापक, बँक आॅफ महाराष्ट्र.
लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटात असलेला नोकरदार, शेतकरी आणि व्यावसायिक सोने तारण ठेवून गरजा पूर्ण करीत आहेत. शहरी आणि ग्रामीण भागात आर्थिक स्थिती बिघडली आहे. सोने तारणावर सराफा सावकार तात्काळ कर्ज उपलब्ध करून देत आहे. या माध्यमातून अनेक जण गरजा भागवत आहेत.
पुरुषोत्तम कावळे, उपाध्यक्ष, नागपूर सराफा असोसिएशन.
राष्ट्रीयीकृत आणि सहकारी बँकांनी सोने तारण योजना सुरू केल्याने सराफा सावकारांच्या व्यवसायात २५ टक्के घट झाली आहे. ग्रामीण भागात अजूनही सावकारावर ग्राहकांचा विश्वास आहे. अर्ध्या रात्री त्यांना पैसा मिळतो. संकटाच्या काळात नोकरदार वर्गासाठी सोने पैसा उभे करण्याचे सुरक्षित माध्यम आहे.
रविकांत हरडे, माजी अध्यक्ष, नागपूर सराफा असोसिएशन.