झोननिहाय तक्रारी स्वीकारण्यासाठी संपर्क अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2018 09:32 PM2018-11-19T21:32:40+5:302018-11-19T21:34:25+5:30
जनतेच्या अडचणी व तक्रारींची दखल घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शहरातील झोननिहाय जनता दरबार घेणार आहेत. झोननिहाय आयोजित जनता दरबारात जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने तक्रारी स्वीकारण्यासाठी संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करून संबंधित विभागाकडून तक्रारी सोडविण्यासाठी विभाग प्रमुखांनी तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी दिल्यात.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : जनतेच्या अडचणी व तक्रारींची दखल घेत त्या सोडविण्याच्या दृष्टीने पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे शहरातील झोननिहाय जनता दरबार घेणार आहेत. झोननिहाय आयोजित जनता दरबारात जनतेच्या अडीअडचणी सोडविण्याच्या दृष्टीने तक्रारी स्वीकारण्यासाठी संपर्क अधिकाऱ्याची नियुक्ती करून संबंधित विभागाकडून तक्रारी सोडविण्यासाठी विभाग प्रमुखांनी तात्काळ कारवाई करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी दिल्यात.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात महानगरपालिकेच्या झोननिहाय जनता दरबार कार्यक्रमाच्या नियोजनाचा आढावा जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी घेतला. याप्रसंगी विभाग प्रमुखांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मनपा आयुक्त अभिजित बांगर, मुख्यमंत्र्यांच्या विशेष कार्य अधिकारी आशा पठाण, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र्र खजांजी, उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे, महानगरपालिकेचे अपर आयुक्त राम जोशी तसेच नागपूर सुधार प्रन्यासचे अधीक्षक अभियंता सुनील गुज्जेलवार, राज्य वीज वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता मनीष वाठ, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे ३ डिसेंबरपासून महानगरपालिकेच्या झोननिहाय जनता दरबार घेणार आहेत. पहिला जनता दरबार मंगळवारी झोन क्रमांक १० येथे दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. मंगळवारी झोनमध्ये नागरिकांना भेटून जनतेशी संवाद साधणार आहेत. यावेळी जनतेच्या तक्रारीसंदर्भात मंगळवारी झोन येथे तक्रार स्वीकारण्यासाठी झोन कार्यालयात स्वतंत्र कक्ष तयार करून विभागनिहाय तक्रारी पाच दिवस आधी स्वीकारण्यात याव्यात व प्राप्त झालेल्या तक्रारीसंदर्भात संबंधित विभागाकडून या संदर्भात केलेल्या कारवाईचा अहवाल मागविण्यात यावा. म्हणजेच जनता दरबारात प्रश्नांची सोडवणूक सुलभपणे होईल. यादृष्टीने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी दिल्यात.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे झोननिहाय जनतेला भेटून त्यांच्यासोबत संवाद साधणार आहेत. तसेच त्यांचे प्रश्न व अडचणी सोडविणार असल्यामुळे जनता दरबाराविषयीची माहिती प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने संबंधित झोन अधिकाऱ्याने या उपक्रमाचे नियोजन करावे. तसेच ज्या विभागाशी संबंधित तक्रार अथवा प्रश्न प्राप्त होईल त्या सर्व तक्रारींची एकत्र नोंद घेऊन संबंधित विभागाकडे पाठविण्याची जबाबदारी नोडल अधिकाऱ्याची राहील. सुटीच्या दिवशी सुद्धा तक्रारी स्वीकारण्यात येतील व या संदर्भात सर्व जनतेला कळविण्यात यावे, अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.