‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ रामभरोसे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:07 AM2021-03-28T04:07:19+5:302021-03-28T04:07:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर शहरात दररोज तीन ते साडेतीन हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर शहरात दररोज तीन ते साडेतीन हजार कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. याचा विचार करता प्रत्येक कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील २० लोकांची तपासणी होणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात महापालिकेचे पथक निम्म्याही लोकांपर्यंत पोहचत नाही. दुसरीकडे ज्यांच्यापर्यंत पोहचतात ते चाचणी करण्यास टाळाटाळ करतात. त्रास वाढल्यानंतर डॉक्टरांकडे जातात. असे विदारक चित्र सध्या शहरात आहे. त्यात गृहविलगीकरणातील ३० हजार बाधितांपर्यंत मनपाकडून औषध पुरवठा होत नसल्याच्या तक्रारी आहेत.
दररोजची बाधितांची संख्या विचारात घेता त्यांच्या संपर्कात येणाऱ्यांचा आकडा हा ५० ते ६० हजारापर्यंत जातो. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसाठी मनपाच्या सर्व दहा झोनमध्ये १५१ टीम आहेत. प्रत्येक टीममध्ये दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. कर्मचारी कमी असल्याने ते २० ते २५ हजार लोकांपर्यंतच पोहचत आहेत. उर्वरित संशयितांशी संपर्क न झाल्याने व स्वत: चाचणीसाठी पुढे येण्यास टाळाटाळ करतात. अशा बाधितांचा शोध घेणे शक्य नाही. असे सुपर स्प्रेडर्स वस्त्यावस्त्यांत फिरत आहेत.
टीममधील कर्मचारी बाधितांचे कुटुंबीय व त्यांच्या परिसरातील इतर नागरिकांपर्यंतच पोहचणे गरजेचे आहे. परंतु सर्वाच्या घरी पोहचत नाही. अशी सक्षम यंत्रणा निर्माण करण्यासाठी आणखी मनुष्यबळाची गरज आहे. बहुसंख्य लोक आम्हाला लक्षणे नाही, असे सांगून चाचणी करण्याचे टाळतात, अशी माहिती टीममधील कर्मचाऱ्यांनी दिली.
....
रुग्णांना औषधी मिळत नाहीत
शहरात ३० हजारांच्या आसपास गृहविलगीकरणातील रुग्ण आहेत. या बाधितांपर्यंत औषध पोहोचवले जात नाही, त्यांची विचारपूसही केली जात नाही. बाधितांच्या प्रकृतीची विचारपूस होणे आवश्यक आहे. दुसरीकडे संपर्क साधण्यासाठी दिलेल्या क्रमांकावर फोन लागत नसल्याच्या रुग्णांच्या तक्रारी आहेत.
.......
विलगीकरण केंद्रात केवळ २५० रुग्ण
शहरात दररोज कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना महापालिकेने निर्माण केलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये फक्त २५० रुग्ण आहेत. कोविड केअर सेंटर असताना रुग्णांची गृहविलगीकरणाला पसंती आहे. सध्या पाचपावली, व्हीएनआयटी आणि आमदार निवासात असे तीन केंद्र सुरू आहेत.
...
२५ हजार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग
नागपूर शहरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. याचा विचार करता मनपाच्या आरोग्य विभागामार्फत कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविण्यात आले आहे. दररोज २५ हजार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे. सध्या १५१ टीम कार्यरत असून दररोज २५ हजार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केले जात आहे.
डॉ. संजय चिलकर, आरोग्य अधिकारी, मनपा