‘मोक्का’ मार्गी लावण्यासाठी मित्रांशी संपर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2016 03:07 AM2016-03-04T03:07:47+5:302016-03-04T03:07:47+5:30
या ३५ दिवसात संतोषला मुंबईच्या ‘त्याच्या’ भाईने सर्वतोपरी मदत केल्याची चर्चा आहे.
संतोषला मुंबईच्या भाईची रसद : आलिशान सुविधा दिली
नागपूर : या ३५ दिवसात संतोषला मुंबईच्या ‘त्याच्या’ भाईने सर्वतोपरी मदत केल्याची चर्चा आहे. भाईची काही खास माणसे संतोषच्या सोबत होती. त्यांच्याच मोबाईलवरून संतोष आपल्या जुन्या-नव्या साऱ्या ‘मित्रांना’ फोन करून ‘मोक्का’चा विषय मार्गी लावण्यासाठी संपर्क करीत होता. मात्र संतोषला साऱ्यांनीच झिडकारल्याचेही आता खुलेआम बोलले जाते. परंतु भाईने संतोषची काळजी घेतली. बाहेरगावी, बाहेर प्रांतात राहूनही संतोषला खाण्यापिण्यापासून तो राहण्या-फिरण्यापर्यंतची आलिशान सुविधा उपलब्ध करून दिली. त्यामुळे संतोष पोलिसांना टाळू शकला, असे सांगितले जाते. (प्रतिनिधी)
पोलिसांची सतर्कता
पोलिसांनी संतोषच्या तपासात कमालीची सतर्कता घेतली आहे. पोलीस अधिकारी बोलण्याचे टाळत आहेत. मात्र २६ तासाच्या कालावधीत पोलिसांनी संतोषच्या नागपूरबाहेरच्या वास्तव्याची माहिती मिळवली आहे. फरारीच्या ३५ दिवसांच्या कालावधीत आपण एकटेच असल्याचा संतोष दावा करीत आहे. मात्र, तो खोटा बोलत असल्याचा पोलिसांना पक्का विश्वास आहे. त्याच्यासोबत फरारीच्या कालावधीत एकापेक्षा जास्त साथीदार असावेत आणि ते सर्व बाहेरगावचेच असावेत, असा आपला अंदाजच नाही तर विश्वास असल्याचे वरिष्ठ पोलीस अधिकारी सांगतात. हे साथीदार लवकरच सोनेगाव पोलीस ठाण्याच्या कोठडीत दिसतील, असाही दावा वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत.