कंटेनरचालकाने लांबविला १२ लाखांचा माल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2019 08:39 PM2019-07-27T20:39:49+5:302019-07-27T20:40:26+5:30
ट्रान्सपोर्टने मिहानमध्ये पोहचविण्यास दिलेल्या मालापैकी १२ लाखांचा माल कंटेनरचालकाने परस्पर लांबविला. शुक्रवारी सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ट्रान्सपोर्टने मिहानमध्ये पोहचविण्यास दिलेल्या मालापैकी १२ लाखांचा माल कंटेनरचालकाने परस्पर लांबविला. शुक्रवारी सोनेगाव पोलिसांनी या प्रकरणी आरोपी कंटेनरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
रूपेश जगन्नाथप्रसाद मिश्रा (वय ४०) हे दत्तवाडी वसंत विहार कॉलनीत राहतात. ते जयश्री ट्रान्सपोर्टचे कर्मचारी आहे. त्यांनी गारमेंटचे ५६० बॉक्स आरोपी चालक भाऊराव रामचंद्र आमनकर (वय ३१, रा. मुहखेड, नांदेड) याच्या कंटेनर (टीएन ०९/ आर ९४४८) मध्ये न्यू दमन मधून मिहान परिसरात आणण्यासाठी २० जुलैला पाठविले होते. दोन दिवसानंतर आरोपींकडून माल नागपुरात आल्यानंतर २२ जुलैला तपासणी केली असता आरोपीने कंटेनरचे सील तोडून त्यातून गारमेंटचे ९२ बॉक्स लांबविल्याचे लक्षात आले. आरोपीने लांबविलेल्या मालाची किंमत १२ लाख, १०, ७१५ रुपये आहे. आरोपी आमनकरला या संबंधाने विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याने विश्वासघात केल्याचे लक्षात आल्याने मिश्रा यांनी सोनेगाव ठाण्यात शुक्रवारी तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू आहे.