नागपुरात दूषित पाणीपुरवठा, नळातून किडे अन् लार्व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 12:29 AM2018-05-16T00:29:52+5:302018-05-16T00:30:12+5:30
मोहननगरातील लाला जयनारायण मार्ग, चौरसिया चौक, परिसरात सेंट जोसेफ स्कूलच्या मागील भागातील वस्त्यातील नागरिकांना एक तास पाणीपुरवठा होतो. यात अर्धातास नळाला दूषित पाणी येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोहननगरातील लाला जयनारायण मार्ग, चौरसिया चौक, परिसरात सेंट जोसेफ स्कूलच्या मागील भागातील वस्त्यातील नागरिकांना एक तास पाणीपुरवठा होतो. यात अर्धातास नळाला दूषित पाणी येते. पाण्यासोबतच किडे आणि लार्वा येतो. मोहननगरलगतच्या गड्डीगोदाम, परदेशीपुरा, सुंदरबाग यासह अनेक भागात पाण्याची समस्या आहे. दूषित पाण्यामुळे नागरिकांना विविध आजारांना सामोेरे जावे लागत असल्याची व्यथा या भागातील नागरिकांनी मांडली.
हॅन्डपंपाला दूषित पाणी
मोहननगर व गड्डीगोदामच्या अनेक भागात हँडपंप आहेत. अनेक भागात नळाला पाणी येत नसल्याने हॅडपंपची मदत होते. परंतु हॅडपंपालाही दूषित पाणी येत असल्याने याचा उपयोग होत नाही.
नाल्यात जुन्या लाईन
मोहननगर व गड्डीगोदाम भागातील नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार या भागात अजूनही जुनी पाईपलाईन आहे. लाईन लिकेज असल्याने नळाला दूषित पाणी येते. मोहननगर भागातील नाल्याची मागील अनेक महिन्यात स्वच्छ करण्यात आलेली नाही. याच नाल्यातून पाण्याची लाईन गेली आहे. गड्डीगोदाम व परदेशीपुरा भागातील नालाही तुंबला आहे. या नाल्यातूनही पाण्याची लाईन गेली आहे.
विहिरीकडे दुर्लक्ष
या भागात जुन्या विहिरी आहेत. परंतु प्रशासनाचे लक्ष नसल्याने विहिरी कचऱ्यामुळे बुजल्या आहेत. काही विहिरींवर अतिक्रमण झाले आहे. गड्डीगोदाम परिसरातील सुंदरबाग येथील विहिरीवर अतिक्रमण केले असल्याने या विहिरीवरून होणारा पाणीपुरवठा बंद आहे.
पाण्यातून निघतात किडे
नळाच्या पाण्यासोबतच किडे निघत असल्याची माहिती मोहननगर येथील रहिवासी ज्ञानचंद कनोजिया यांनी सांगितली. परंतु पर्याय नसल्याने या पाण्याचा वापर करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. पाणीपुरवठ्याची पर्यायी व्यवस्था नसल्याने हॅन्डपंपाच्या दूषित पाण्याचा वापर करावा लागतो.
दुसऱ्या भागातून पाणी आणावे लागते
या भागात सार्वजनिक नळावरून पाणी भरावे लागते. परंतु नळाला दूषित पाणी येत असल्याने लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. गेल्या काही दिवसापासून नळाला दूषित पाणी येत असल्याने दुसऱ्या भागातून लोकांना पाणी आणावे लागते. अशी माहिती दुकानदार मनीष लाडे यांनी दिली.
पाण्याला दुर्गंध
मोहननगर येथे पाण्याची भीषण टंचाई आहे. माझ्या घरातील नळाला अर्धा तासही पाणी येत नाही. अनेकदा नळाला पाणी येत नाही. सुरुवातीला नळाच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याची माहिती रंजना घोडे यांनी दिली.
पाणी गाळूनच प्यावे लागते
नळाला दूषित पाणी येत असल्याबाबत लोकप्रतिनिधीकडे अनेकदा तक्रार केली. परंतु समस्या कायम आहे. त्यामुळे नाईलाज म्हणून दूषित पाण्याचा वापर करावा लागत आहे. बोअरवेलच्या पाण्याला दुर्गंधी असल्याने पाण्याचा वापर करता येत नसल्याची माहिती गड्डीगोदाम येथील रहिवासी चंदा टेंभुर्णे यांनी दिली.
अर्धा तासही पाणी येत नाही
पाण्यासाठी पहाटे उठावे लागते. पण नळाला अर्धा तासही पाणी येत नाही. पहाटे जाग आली नाही तर पाणी मिळत नाही. दिवसभर पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. नळ आल्यानतंर सुरुवातीला काहीवेळ दूषित पाणी येते. किडे असल्याने या पाण्याचा वापर करता येत नाही, अशी माहिती चंद्रकला सहारे यांनी दिली.
वापरण्याजोगे पाणी नसते
नळाला दूषित पाणी येत असून त्यात किडे असतात. यामुळे पाण्याचा वापर करता येत नाही. त्यामुळे मुख्य चौकात जाऊन पाणी आणावे लागते. पाण्याची समस्या सोडविण्यासाठी कुणीही पुढाकार घ्यायला तयार नसल्याची व्यथा गड्डीगोदाम भागातील सुंदरबन येथील अशलीना चौधरी यांनी मांडली.
नवीन नळ कनेक्शनची प्रतीक्षा
पाण्याची नवीन लाईन टाकण्यात आलेली आहे. आमच्या घरी नळ नाही. नळ कनेक्शन मिळण्याची प्रतीक्षा आहे. त्यामुळे सार्वजनिक नळावरून पाणी आणावे लागते. येथेच कपडे धुवावे लागतात. पाण्याला दुर्गंधी असून दुषित पाणीपुरवठा होत असल्याची माहिती मीनाबाई मांडवतकर यांनी दिली.
तक्रार करूनही समस्या कायम
चौरसिया चौक भागात गेल्या अनेक दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा होतो. यासंदर्भात महापालिक प्रशासनाकडे तक्रार केली. दूषित पाण्याचे नमुने दिले. अधिकारी आले, त्यांनी या भागाची पाहणी केली. परंतु आजही समस्या कायम असल्याची व्यथा चौरसिया चौक येथील रहिवासी बीना गायकवाड यांनी मांडली.
थोडाच वेळ नळाला पाणी
सेंट जोसेफ स्कूल गल्लीत पाण्याची समस्या कायम आहे. उन्हाळ्याच्या दिवसात ही समस्या आणखी तीव्र बनली आहे. नळाला काहीवेळ पाणी येते. त्यातही दूषित पाण्याचा पुरवठा होतो. यामुळ अडचणींचा सामना करावा लागतो, अशी माहिती दिनेश मोहिते यांनी दिली.
नळाद्वारे दूषित पाण्याचा पुरवठा
मोहननगर येतील रहिवासी रितेश वल्लूरवार म्हणाले, मोहननगर येथील नाला कचºयामुळे तुंबला आहे. मागील काही महिन्यात नाल्याची साफसफाई करण्यात आलेली नाही. या नाल्यातूनच गेलेली नळाची पाईपलाईन लिकेज असल्याने नळाला दूषित पाणी येते. ही लाईन बदलवण्याची गरज आहे.
पाणीपुरवठा होत नाही
शिव मंदिर परिसरातील वस्त्यांतील नळ कोरडे पडलेले आहे. अजिबात पाणीपुरवठा होत नाही. या भागात जुनी लाईन आहे. नवीन लाईनचे काम अर्धवट असल्याने लोकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याची माहिती छाया जत्तलवार यांनी दिली.
पाणी समस्येकडे दुर्लक्ष
गड्डीगोदाम भागात पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना टंचाईचा सामना करावा लागत आहे. जुन्या लाईनवर नळ आहेत परंतु ही लाईन जीर्ण झाली आहे. लिकेज असल्याने नळाला दूषित पाणी येते. यासंदर्भात वारंवार तक्रार करूनही समस्या मार्गी लागत नसल्याचे सामाजिक कार्यक र्ते जयंत टेंभूरकर यांनी सांगितले.
पाण्यासाठी करावी लागते भटकंती
नळाला पुरेसे पाणी येते नाही. कधीकधी दोन दिवस नळ येत नाही. अशा परिस्थितीत आजूबाजूच्या वस्त्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यातच नळाला दूषित पाणी येत असल्याने नागरिकांना संकटांचा सामना करावा लागतो, अशी व्यथा देवचंद भोतमांगे यांनी मांडली.
पाण्याची नवीन लाईन टाकावी
नळाची पाईपलाईन नाल्यातून गेलेली आहे. ही लाईन जुनी असल्याने ठिकठिकाणी लिकेज आहे. यामुळे नळाला दूषित पाणी येते. यात अनेकदा किडे असतात. या भागात पाण्याची नवीन लाईन टाकण्याची गरज असल्याचे परदेशीपुरा येथील रहिवासी द्रौपदी पकिड्डे यांनी सांगितले.