बाबासाहेब व भाऊसाहेबांचे शेतीविषयक विचार परस्परपूरक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 11:53 PM2018-04-10T23:53:59+5:302018-04-10T23:54:11+5:30
डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच देशाच्या उभारणीतील विचार परस्परपूरक होते. दुर्दैवाने देशाने त्यांचे धोरण स्वीकारले नसल्याने शेती व शेतकऱ्यांसमोरील समस्या आजही कायम राहिल्या, अशी खंत प्रसिद्ध कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डॉ. आंबेडकर यांनी ‘स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया’मधून शेतकऱ्यांसमोर येणाऱया समस्या अधोरेखित करून त्यावरील उपाय सुचविले होते. डॉ. भाऊसाहेब देशमुखांनी शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा प्रयत्न केला होता. या दोन्ही महापुरुषांचे शेतीविषयक आणि एकूणच देशाच्या उभारणीतील विचार परस्परपूरक होते. दुर्दैवाने देशाने त्यांचे धोरण स्वीकारले नसल्याने शेती व शेतकऱ्यांसमोरील समस्या आजही कायम राहिल्या, अशी खंत प्रसिद्ध कृषितज्ज्ञ अमिताभ पावडे यांनी व्यक्त केली.
जनमंच व अॅग्रोव्हेट-अॅग्रोइंजिनीअर्स मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाबासाहेब ते भाऊसाहेब : या दोन महापुरुषांचे शेतीविषयक विचारधन आजच्या काळाशी सुसंगत कसे?’ यावर व्याख्यानाचे आयोजन केले होते. याप्रसंगी बँक आॅफ महाराष्ट्रचे माजी महाव्यवस्थापक हरिश्चंद्र सुखदेवे, जनमंचचे अध्यक्ष शरद पाटील, नरेश क्षीरसागर आदी प्रामुख्याने उपस्थित होते. अमिताभ पावडे म्हणाले, शेतकरी, शेतमजूर व कष्टकऱ्यांच्या शोषणाचे मूळ धर्मात आहे. धर्माच्या नावाने अनेक बंधने त्यांच्यावर लादली गेली आणि या कष्टकऱ्याने अंधश्रद्धेमुळे ही मानसिक गुलामी स्वीकारली. या दोन्ही महापुरुषांनी विज्ञानवाद व सद्सद्विवेकबुद्धी स्वीकारण्याचे आवाहन केले होते. ते न स्वीकारल्यामुळे शेतकरी आजही वाईट अवस्थेत असल्याचे ते म्हणाले. डॅमची निर्मिती, नदीजोड प्रकल्प ही
बाबासाहेबांनी सुचविलेली धोरणे होती. भाऊसाहेबांनी आधुनिक तंत्रज्ञानासोबत भारतीय शेतकऱ्यांना जगातील शेतकऱ्यांशी जोडण्याचे प्रयत्न केले. भारतीय कृषीसंबंधी केलेल्या जागतिक कराराचा त्यांनी विरोध केला. त्यांनी कॉम्प्रिहेन्सीव्ह क्रॉप इन्शुरन्सची अट घातली होती व त्यासाठी त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामाही दिला होता. शेतकऱ्यांनी अधिक उत्पादनाच्या भानगडीत पडण्यापेक्षा नैसर्गिक रूपाने जमिनीतून आवश्यक तेवढेच उत्पादन घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. सरकारकडून शेतकऱ्यांच्या नावाने सबसिडी दिली जाते. मात्र याचा खरा फायदा कंपन्या व उद्योगपती लाटत आहेत. सरकारनेच तशी व्यवस्था केल्याची टीका त्यांनी केली.
यावेळी हरिश्चंद्र सुखदेवे यांनी कृषी उत्पादनांची मूल्य व्यवस्थापन पद्धत चुकीची असल्याचे मत व्यक्त केले. बाबासाहेबांच्या धोरणातील जमिनीचे राष्ट्रीयकरण व भाऊसाहेबांनी माडलेले को-आॅपरेटिव्ह धोरण अधोरेखित केले. दोन्ही महापुरुषांनी त्यांच्या समाजामध्ये बौद्धिक भांडवल निर्माण केल्याचे सांगत, हे भांडवल नियोजन करून वापरण्याचे आवाहन सुखदेवे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन श्रीकांत दोड यांनी केले तर प्रास्ताविक जनमंचचे सचिव प्रणय पराते यांनी केले. अॅग्रोव्हेटचे अध्यख दिलीप मोहितकर यांनी आभार व्यक्त केले.