नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना अवमान नोटीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:09+5:302021-09-06T04:11:09+5:30
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना अवमान नोटीस बजावून तीन आठवड्यांत ...
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका प्रकरणात नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांना अवमान नोटीस बजावून तीन आठवड्यांत स्पष्टीकरण सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
शिंदे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष व घाटंजी येथील नगरसेवक गजानन भालेकर यांनी उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल केली आहे. घाटंजी नगर परिषदेच्या अध्यक्ष नयना ठाकूर व उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांनी विविध बेकायदेशीर कामे केली, असा भालेकर यांचा आरोप आहे. त्यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारीवर तीन महिन्यांत निर्णय घेण्याचा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला होता. त्या आदेशाचे पालन झाले नाही, असे भालेकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे त्यांनी ही याचिका दाखल करून शिंदे यांच्यावर अवमान कारवाई करण्याची विनंती केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व गोविंद सानप यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने प्राथमिक मुद्दे लक्षात घेता शिंदे यांना अवमान नोटीस बजावली.
यापूर्वी भालेकर यांनी सरकारने संबंधित तक्रारीची दखल न घेतल्यामुळे रिट याचिका दाखल केली होती. त्यात न्यायालयाने सरकारला या तक्रारीवर तीन महिन्यात निर्णय घेण्याचा आदेश दिला होता व ती याचिका निकाली काढली होती. अध्यक्ष नयना ठाकूर व उपाध्यक्ष शैलेश ठाकूर यांच्या अवैध कामांची चौकशी करण्यात यावी आणि त्यांना महाराष्ट्र नगर परिषद, नगरपंचायत व औद्योगिक शहर अधिनियमानुसार अपात्र घोषित करण्यात यावे, अशा मागण्या भालेकर यांनी तक्रारीत केल्या आहेत. भालेकर यांच्यातर्फे ॲड. अनिल ढवस यांनी कामकाज पाहिले.