कोविडचा प्रादुर्भाव संपेपर्यंत सॅनिटायझिंग सुरू ठेवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 09:54 PM2020-06-01T21:54:56+5:302020-06-01T21:56:45+5:30
शहरात कोविडचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत शहरातील रहिवासी क्षेत्र आणि अन्य ठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत नियमित सॅनिटायझिंग सुरू ठेवा, असे निर्देश सोमवारी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरात कोविडचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दररोज रुग्णांची भर पडत आहे. अशा स्थितीत शहरातील रहिवासी क्षेत्र आणि अन्य ठिकाणी कोविडचा प्रादुर्भाव जोपर्यंत आहे तोपर्यंत नियमित सॅनिटायझिंग सुरू ठेवा, असे निर्देश सोमवारी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.
मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आरोग्य समितीची बैठक घेण्यात आली. यावेळी सदस्य संजय बुरेवार, विशाखा बांते, सरिता कावरे, आशा उईके, लीला हाथीबेड, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, संजय निपाने, प्रभारी निगम सचिव डॉ. रंजना लाडे, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, हत्तीरोग व हिवताप अधिकारी दीपाली नासरे आदी उपस्थित होते.
बैठकीत कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगावर यानंतर पुढे प्रतिबंध व नियंत्रणाबाबत उपाययोजना, शहरातील लहान व मोठे नाले सफाईबाबत दरवर्षी स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने त्यावर होणारा खर्च व या कामासाठी नवीन मशीनरी खरेदी संदर्भाच्या तक्रारीवर संबंधित विभागप्रमुखांशी चर्चा करण्यात आली.
कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत योगेंद्र सवाई यांनी माहिती सादर केली. कोणतेही लक्षण नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. शहरातील रुग्णसंख्या वाढल्यास खासगी रुग्णालयांमध्येही उपचार सुरू केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. खासगी रुग्णालयांसंदर्भात मनपातर्फे दिशानिर्देश जारी करण्यात यावे, तसेच बी.व्ही.जी. संदर्भात चौकशी समिती गठित करा, असेही निर्देश कुकरेजा यांनी दिले.