दुकाने पूर्णवेळ सुरू ठेवा; निर्बंधांना व्यापाऱ्यांचा विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2021 04:11 AM2021-09-08T04:11:43+5:302021-09-08T04:11:43+5:30
नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत आणि हॉटेल व रेस्टॉरंट रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे ...
नागपूर : पालकमंत्री नितीन राऊत यांनी दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत आणि हॉटेल व रेस्टॉरंट रात्री ८ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे सूतोवाच केल्याने व्यापाऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. वेळेच्या निर्बंधामुळे खास गणेशोत्सवात विक्रीसाठी आणलेला माल पडून राहील, शिवाय व्यापाऱ्यांना पूर्वीसारखेच आर्थिक नुकसान सोसावे लागेल. वेळेच्या निर्बंधामुळे नागपुरातील व्यापाऱ्यांना गणेशोत्सवात किमान ५० कोटींचे नुकसान सोसावे लागेल, अशी स्पष्टोक्ती विविध व्यापारी संघटनांनी लोकमतशी बोलताना दिली.
सरकारने निर्बंधाची घाई करू नये
पालकमंत्र्यांनी व्यापारी संघटनांसोबत चर्चा करून निर्बंध लावू, असे म्हटले आहे, पण नेहमीच्या अनुभवानुसार चर्चा न करताच राज्य सरकार वेळेचे निर्बंध लावते. टास्क फोर्सच्या बैठकीनुसार राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. त्यामुळे दोन दिवसात नागपूरसह राज्यात वेळेचे निर्बंध लागणार, हे निश्चित आहे. चर्चा केवळ औपचारिकता ठरणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. राज्य सरकारच्या निर्णयावर व्यापाऱ्यांना आक्षेप आणि विरोध आहे. हा चिंतेचा विषय आहे. तात्काळ निर्णय न घेता सरकारने वाट पाहून गणेशोत्सवानंतर निर्णय घ्यावा. लॉकडाऊनमुळे व्यापाराची कंबर तुटली आहे. गणेशोत्सवात भरपाई होईल, या अपेक्षेने व्यापाऱ्यांनी घर आणि सोने गहाण ठेवून बँकांमधून कर्ज घेतले आहे. स्वत:ची नव्हे तर दुकानाचे भाडे, विजेचे बिल, नोकरांचे पगार आणि बँकेच्या व्याजाची चिंता असल्याचे व्यापारी म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक्स व ऑटोमोबाईल क्षेत्राला बसणार फटका
दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू राहिल्यास सर्वाधिक फटका इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्राला बसणार आहे. गणेशोत्सवात बहुतांश ग्राहक नवीन वस्तू खरेदीसाठी दुपारनंतरच घराबाहेर पडतात. पण दुकाने बंद राहिल्यास त्यांच्यासमोर खरेदीचा आणि दुकानदारांसमोर विक्रीचा प्रश्न निर्माण होणार आहे. श्रीकांत इलेक्ट्रॉनिक्सचे श्रीकांत भांडारकर म्हणाले, शोरूममध्ये इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करताना कंपनीला आगाऊ चेक द्यावे लागतात. गणेशोत्सवात नवीन मॉडेल आणि अन्य उपकरणे शोरूमध्ये विक्रीसाठी बोलवितो. पुरवठा आणि विक्रीवर व्यवसाय अवलंबून आहे. पण दुकाने पुन्हा दुपारी ४ वाजेपर्यंत राहतील तर उपकरणांची विक्री कशी करायची, हा गंभीर प्रश्न आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यंदाही नुकसान सोसावे लागेल. आदित्य हीरोचे डॉ. पी.के. जैन म्हणाले, लोक गणेशोत्सवात नवीन दुचाकी व चारचाकी खरेदी करून घरी नेतात. पण यंदाही वेळेच्या निर्बंधांचा विक्रीवर परिणाम होणार आहे. सरकारने लॉकडाऊनची घाई करू नये.