नागपूरच्या सेतू कार्यालयातील गर्दी कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2019 10:51 PM2019-07-03T22:51:32+5:302019-07-03T22:52:54+5:30
शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये अचानक गर्दी वाढते. कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून थेट शाळांमध्ये शिबिरे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतला परंतु सेतू कार्यालयातील गर्दी अजूनही कायम आहे. दररोज १५०० वर अर्ज येत आहेत. यासाठी ५ अतिरिक्त खिडक्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शाळा सुरू होण्याअगोदर जिल्हाधिकारी कार्यालयातील सेतूमध्ये अचानक गर्दी वाढते. कार्यालयात गर्दी होऊ नये म्हणून थेट शाळांमध्ये शिबिरे घेण्यात आली. विद्यार्थ्यांनी त्याचा लाभही घेतला परंतु सेतू कार्यालयातील गर्दी अजूनही कायम आहे. दररोज १५०० वर अर्ज येत आहेत. यासाठी ५ अतिरिक्त खिडक्याही सुरू करण्यात आल्या आहेत.
जून महिन्यात शाळा सुरू होतात. यासाठी विद्यार्थ्यांना जातीचे प्रमाणपत्र,नॉन क्रिमीलेयर, अधिवास, उत्पन्नाचा दाखला आदीं प्रमाणपत्राची आवश्यकता असते. अशावेळी सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. ही गर्दी लक्षात घेता जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी यावर्षीही विविध शाळांमध्ये शिबिरे घेतली. या शिबिरांना विद्यार्थी व पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला. यानंतरही सेतूमध्ये होणारी गर्दी काही कमी झालेली नाही. सध्या जुलै महिना सुरु आहे. गर्दीत कमतरता आल्याचे सेतूमधील कर्मचारी सांगतात. परंतु दररोज किमान १५०० वर अर्ज येत आहेत. त्यामुळे गर्दी कायम आहे, असेच म्हणता येईल. सेतू कार्यालयात एकूण १५ खिडक्या आहेत. साधारणपणे १० खिडक्या सुरू असतात. परंतु विद्यार्थ्यांची गर्दी लक्षात घेता सर्व १५ खिडक्याही सुरू ठेवण्यात आलेल्या आहेत.
उत्पन्नाचे प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेअर आणि अधिवास या प्रमाणपत्रासाठीच सध्या जास्त अर्ज येत आहेत. काही दिवस ही गर्दी कायम राहील असे सांगितले जाते.
शाळा-महाविद्यालयातील शिबिरांत साडेसात हजारावर अर्ज
जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी विद्यार्थ्यांना सोयीचे व्हावे म्हणून विविध प्रमाणपत्रासाठी शाळा महाविद्यालयांमध्ये विशेष शिबिर आयोजित केले. दोन टप्प्यात हे शिबिर पार पडले. पहिल्या टप्प्यात ८ व ९ जून रोजी तिडके महाविद्यालय, आंबेडकर महाविद्यालय, गजानन विद्यालय, डी.डी.नगर विद्यालय आणि महात्मा गांधी विद्यालय येथे शिबिर पार पडले. या शिबिरामध्ये एकूण २४०३ अर्ज प्राप्त झाले तर दुसऱ्या टप्प्यात २२ व २३ जून रोजी संताजी महाविद्यालय, रामनगर विद्यालय, जिंगल बेल विद्यालय, पंडित बच्छराज विद्यालय आणि राजेंद्र हायस्कुल येथे शिबिर पार पडले. याशिबिरात तब्बल ५३३३ विद्यार्थ्यांनी विविध प्रमाणपत्रांसाठी अर्ज केले. असे एकूण ७७३६ विद्यार्थ्यांनी शाळा-महाविद्यालय अर्ज केले. याचाच अर्थ इतके विद्यार्थ्यांना सेतू कार्यालयात जाण्याची गरज पडली नाही. ते आले असते तर एका विद्यार्थ्यासोबत किमान १ ते २ जण येतात. त्यामुळे जवळपास १५ हजार लोकांची गर्दी सेतू कार्यालयात झाली असती. ती या शिबिरामुळे कमी झाल्याचे सांगितले जाते.