व्यापाऱ्याच्या हत्येची सुपारी देणारा जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2018 12:16 AM2018-08-18T00:16:45+5:302018-08-18T00:18:55+5:30
राजनांदगाव (छत्तीसगड) पोलिसांना गेल्या १० वर्षांपासून वॉन्टेड असलेला आरोपी सौरभ उत्तमचंद जैन (वय ३५, रा. रामाधीन मार्ग, कमल टॉकीजजवळ राजनांदगाव) याच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पथकाने मुसक्या बांधण्यात शुक्रवारी यश मिळवले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राजनांदगाव (छत्तीसगड) पोलिसांना गेल्या १० वर्षांपासून वॉन्टेड असलेला आरोपी सौरभ उत्तमचंद जैन (वय ३५, रा. रामाधीन मार्ग, कमल टॉकीजजवळ राजनांदगाव) याच्या गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पथकाने मुसक्या बांधण्यात शुक्रवारी यश मिळवले.
आरोपी सौरभ जैन हा व्यापारी आहे. त्याने व्यावसायिक स्पर्धेतून करमचंद अग्रवाल नामक व्यावसायिकाची २००८ मध्ये सुपारी देऊन हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. सौरभचा नोकर चुन्ना यानेच सुपारी घेऊन अग्रवाल यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. या प्रकरणाने त्यावेळी राजनांदगाव-रायपूरमध्ये खळबळ उडवून दिली होती. प्राणघातक हल्ल्यातून अग्रवाल बचावले. त्यावेळी पोलिसांनी चुन्नाला अटक केली होती. मात्र, सौरभ जैन फरार झाला होता. गेल्या १० वर्षांपासून तो भारतातील विविध शहरात वेळोवेळी पत्ता बदलवून राहत होता. राजनांदगावच्या गुन्हे शाखेला तो वॉन्टेड होता. त्याची माहिती छत्तीसगड पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी नागपूर पोलिसांनाही कळविली होती. त्या माहितीच्या आधारे शोधाशोध करून येथील गुन्हे शाखा युनिट ३ च्या पोलीस पथकाने सौरभ जैनचा पत्ता शोधला. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आनंदम सिटी येथे आलिशान सदनिकेत राहत असल्याचे कळताच पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जगवेंद्रसिंग राजपूत, एपीआय ज्ञानेश्वर भेदोडकर, उपनिरीक्षक मोकाशे तसेच त्यांच्या सहकाºयांनी शुक्रवारी आरोपी सौरभ जैनला ताब्यात घेतले. ही माहिती राजनांदगाव पोलिसांना कळवून येथे बोलवून घेण्यात आले. त्यानंतर जैनला राजनांदगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
---