वीज जनित्र सेवेचे कंत्राट संपले

By admin | Published: June 21, 2017 02:21 AM2017-06-21T02:21:03+5:302017-06-21T02:21:03+5:30

वीज जनित्र सेवेचा करार एक वर्षापूर्वी संपल्याने वीज पुरवठा खंडित होताच ‘बॅकअप’अभावी मध्येच लिफ्ट बंद पडण्याचे प्रमाण वाढले

The contract for the power generator service is over | वीज जनित्र सेवेचे कंत्राट संपले

वीज जनित्र सेवेचे कंत्राट संपले

Next

न्यायमंदिरातील लिफ्ट पडताहेत बंद : वकील, नागरिक त्रस्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वीज जनित्र सेवेचा करार एक वर्षापूर्वी संपल्याने वीज पुरवठा खंडित होताच ‘बॅकअप’अभावी मध्येच लिफ्ट बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून भविष्यात एखाद्या मोठ्या धोक्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सोमवारी दुपारी १२.२५ वाजताच्या सुमारास अचानक वीज पुरवठा खंडित होऊन न्यायमंदिर इमारतीतील लिफ्ट बंद पडल्या. त्यापैकी उत्तर भागाकडील अधिक क्षमतेची एक नवीन लिफ्ट पाच आणि सहा मजल्यांच्या मध्ये फसून दहा- बारा जण अडकले. ते सर्व अर्धा तासपर्यंत अडकून पडले होते. सहा महिन्यांपूर्वीही अशीच घटना घडून वकील आणि पक्षकार सुमारे दीड तास लिफ्टमध्ये अडकले होते.
सोमवारी अडकलेल्या लिफ्टमध्ये अंधार होता, साधे व्हेन्टिलेशनही नव्हते. आकस्मिकप्रसंगी संपर्क साधावयाच्या अभियंत्यांची, इलेक्ट्रिशियनच्या नावाची यादी लिफ्टमध्ये असते. परंतु अंधार असल्याने ही यादीही कुणाला दिसत नव्हती. लिफ्टमध्ये अडकलेल्यांमध्ये ज्येष्ठ सरकारी वकील ज्योती वजानी होत्या. त्यांनी मोबाईल टॉर्च सुरू करून संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क करून लिफ्ट अडकल्याची माहिती दिली होती. काळजीवाहक साखळकर आणि इतरांनी धावपळ केली होती. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर कुणीतरी आठव्या मजल्यावर गेले, लिफ्टला पाचव्या मजल्यावर आणून साऱ्यांची सुटका झाली. अनेकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
लिफ्टमध्ये अडकलेल्यांमध्ये सुदैवाने कोणीही हृदयरोगी किंवा अस्थमा रोगी नव्हते. असे रोगी अधिक काळ लिफ्टमध्ये अडकल्यास आॅक्सिजनअभावी त्यांचा गुदमरून मृत्यू होऊ शकतो, अशी भीती काही जाणकारांनी व्यक्त केली. लिफ्टमध्ये अडकल्याने पक्षकार आणि वकिलांचा अर्ध्या तासाचा खोळंबा झाल्याने त्यांची न्यायालयातील कामेही रखडली होती.
न्याय मंदिर इमारतीमध्ये आठ लिफ्ट आहेत. त्यापैकी दोन लिफ्ट न्यायाधीशांसाठी आहेत. सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत वकील, पक्षकार, पोलीस, आरोपी आणि न्यायालयीन कर्मचाऱ्यांची लिफ्टमध्ये तोबा गर्दी असते.
आठव्या मजल्यावर न्यायालय कक्ष सुरू करण्यात आल्याने या ठिकाणी दिवाणी न्यायालये आणि अपघात दाव्यांच्या न्यायालयांचे कामकाज चालते. दिवाणी न्यायालयात जाणाऱ्यांची गर्दी अधिक असते तरअपघात दाव्यांच्या न्यायालयात दिव्यांग व्यक्तींची गर्दी असते. त्यांना लिफ्टशिवाय पर्याय नसतो.
दरम्यान बंद लिफ्टमधून सुटका होताच ज्योती वजानी यांनी प्रमुख जिल्हा न्यायाधीश विलास डोंगरे यांचे केबिन गाठून त्यांना घटनेची माहिती दिली. सह्याची मोहीम राबवून जिल्हा वकील संघटनेलाही निवेदन देण्यात आले. वीज खंडित झाली असली तरी तिचे बॅकअप कायम राहण्यासाठी वीज जनित्राचा सेवा करार कायम चालू ठेवण्यात यावा, भविष्यात अशी घटना घडू नये, यासाठी काळजी घेण्यात यावी,अशी मागणी वकिलांनी केली आहे.

Web Title: The contract for the power generator service is over

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.