एटीएमला सुविधा पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 09:10 PM2020-08-07T21:10:30+5:302020-08-07T21:11:42+5:30
एटीएमच्या प्रवेशदारावर सुरक्षा गार्ड ठेवण्याची आणि ग्राहकांना सॅनिटायझर पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची असल्याचे मत बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एटीएमच्या प्रवेशदारावर सुरक्षा गार्ड ठेवण्याची आणि ग्राहकांना सॅनिटायझर पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची असल्याचे मत बँकांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना व्यक्त केले. लोकमतने बुधवारच्या अंकात ‘एटीएममध्ये प्रवेश धोकादायकच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित केले होते. या संदर्भात अनेक ग्राहकांनी लोकमतकडे आपल्या भावना व्यक्त व्यक्त केल्या आहेत. कोरोना संसर्ग थांबविण्यासाठी एटीएममध्ये सॅनिटायझर आवश्यक असल्याचे ग्राहकांनी सांगितले.
सदर प्रतिनिधीने राष्ट्रीयीकृत बँकांच्या विविध एटीएमची पाहणी करून सत्यस्थिती वाचकांसमोर मांडली होती. सर्वच एटीएमच्या प्रवेशदारावर सुरक्षा गार्ड आणि आतमध्ये सॅनिटायझरची व्यवस्था नव्हती. अनेक ग्राहकांनी स्वत:जवळील सॅनिटायझरने बटन स्वच्छ केल्या आणि हातावर लावले. सॅनिटायझर पुरविण्याची जबाबदारी कंत्राटदार कंपनीची आहे, पण याबाबत ग्राहक स्वत:च सजग दिसले. दारावर सुरक्षा गार्ड नसल्याने ग्राहक रांगेत न येता एकाचवेळी अनेकजण आत जाताना दिसले. एका एटीएममध्ये एक महिला दोन लहान मुलींसोबत आत गेली. या दोन्ही मुलींनी मास्क लावले नव्हते. ग्राहकांनी मास्क घातले वा नाही, याची तपासणी करण्यासाठी दारावर सुरक्षा गार्ड असणे आवश्यक असल्याचे मत काही ग्राहकांनी व्यक्त केले. एटीएमची जबाबदारी कुणाकडे आहे, याची आम्हाला माहिती नाही, पण बँकांनी ग्राहकांना सुरक्षा प्रदान करावी, अशीही प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली.
कंत्राटदारांना अटी-नियम बंधनकारक
बँकांच्या एटीएम सुरक्षा आणि स्वच्छता व्यवस्थेची जबाबदारी कंत्राटदार कंपनीकडे आहे. कंत्राटदारांना अटी व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्याची पाहणी बँकांतर्फे करण्यात येते. सॅनिटायझर आहे वा नाही, याची पाहणी करू. मुख्यालयातील एटीएमची व्यवस्था बँकेकडे आहे. त्या ठिकाणी सुरक्षा गार्ड आणि सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. ग्राहकांचे तापमान मोजण्यात येत आहे.
विलास पराते, क्षेत्रीय व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया.
सर्व एटीएमची पाहणी करणार
लोकमतच्या वृत्ताची दखल घेतली असून सर्वच एटीएमची पाहणी करणार आहे. सुरक्षा गार्ड व सॅनिटायझर ठेवणे कंत्राटदाराला बंधनकारक आहे. पाहणीनंतर त्रुटी आढळल्यास त्याची पूर्तता करू. कोरोना संसर्गाचा धोका वाढला आहे. बँका व्यवस्था करतेच, पण ग्राहकांनी बटन सॅनिटाईज्ड करणे आवश्यक आहे. एटीएममध्ये सुरक्षा गार्डची नव्याने भरती करण्यात येणार आहे.
मनोज करे, उपमहाव्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र.