कामे पूर्ण होण्यापूर्वीच कंत्राटदार पळाले एफडी घेऊन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:08 AM2021-07-29T04:08:22+5:302021-07-29T04:08:22+5:30
नागपूर : कंत्राटदाराला कामे मिळाल्यानंतर त्याला सुरक्षा ठेव म्हणून काही रक्कम विभागाकडे एफडीच्या रूपात ठेवावी लागते. कामे पूर्ण ...
नागपूर : कंत्राटदाराला कामे मिळाल्यानंतर त्याला सुरक्षा ठेव म्हणून काही रक्कम विभागाकडे एफडीच्या रूपात ठेवावी लागते. कामे पूर्ण झाल्यानंतर, कंत्राटदाराचे बिल निघाल्यानंतर, रीतसर अर्ज करून विभाग प्रमुख कंत्राटदाराला एफडी परत करतो. पण जिल्हा परिषदेच्या कंत्राटदारांनी कामे पूर्ण होण्यापूर्वीच विभागातून एफडी पळवून नेल्या आहेत. यासंदर्भात ७ सदस्यीय समितीची चौकशी सुरू असून, लघुसिंचन विभागातील ५१ फायलींमध्ये हा प्रकार घडला आहे.
मंगळवारी बांधकाम, लघुसिंचन व ग्रामीण पाणी पुरवठा विभागांतील १७२ फाईल तपासणीसाठी चौकशी समितीपुढे सादर करण्यात आल्यात़ यामध्ये लघुसिंचनच्या ५१ फाईलचा समावेश आहे़ त्यामधून एफडीच गहाळ झाल्या आहेत़ जवळपास ४ कोटी २१ लाखांची अनियमितता करून कंत्राटदारांनी ही कामे लाटल्याची माहिती पुढे येत आहे़ यात १८ कंत्राटदारांवर फसवणुकीचा फास अडकण्याची शक्यता आहे़ तर बांधकाम विभागातही एफडी विड्रॉल करण्यात आल्या आहेत. मात्र आपण कामे झाल्यानंतरच एफडी दिल्याचा दावा या विभागाचा आहे़ पाणी पुरवठा विभागात दोन कामांच्या एफडी गहाळ आहेत़ समितीकडून निविदांची फाईल आणि करारनाम्याची फाईल, अशा दोन्ही बाजूंची तपासणी करण्यात येत आहे़ त्यामुळे या घोटाळ्याची व्याप्ती ५० कोटींच्या वर असल्याचे बांधकाम क्षेत्रातील जाणकार सांगतात़
- लघुसिंचन विभागात सर्वाधिक घोळ
प्राप्त माहितीनुसार, लघुसिंचन विभागात सर्वाधिक घोळ झाला आहे. या विभागाच्या आतापर्यंत ५६ फाईल चौकशी समितीकडे रवाना झाल्यात़ त्यातील पूर्वीच पाच फाईल मे. नानक कन्स्ट्रक्शनच्या आहेत़ ज्यात ७३ लाखांची अनियमितता झाली होती. या प्रकरणात पोलिसात गुन्हेही दाखल झाले आहे. आता दोन वर्षांतील ५१ फाईल आढळून आल्यात़, ज्यात सर्व फाईलमधून एफडी बेपत्ता आहेत़ ही कामे १३६ कोटी ३ लाख ३६ हजार ५७४ रुपयांची आहेत़ ज्यातील ४ कोटी २१ लाख १३ हजार ५५१ रुपयांच्या एफडी मुदतपूर्व कंत्राटदारांनी विड्रॉल केल्याची आकडेवारी सांगते़
- टेंडर क्लार्क टार्गेट
कामे विहित मुदतीत पूर्ण न होता कंत्राटदारांना एफडी देण्याची करामत तिन्ही विभागातील टेंडर क्लार्कनी मोठ्या शिताफीने केल्याची बाब प्राथमिक तपासातून पुढे येत आहे़ सोबतच कंत्राटदारांचे मोठे रॅकेटच या कामांत गुंतल्याची शक्यता आहे़
- चौकशी समितीचे काम वेगात सुरू असून दररोज फाईलींचा ओघ समितीकडे सुरू आहे़ दोषी आढळलेल्या कंत्राटदाराला सोडण्यात येणार नाही़ कारवाई शंभर टक्के होईल़
- डॉ. कमलकिशोर फुटाणे, अतिरिक्त सीईओ