नागपूर मनपा वित्त अधिकाऱ्यांची मनमानी खपवून घेणार नाही : कंत्राटदारांची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 09:02 PM2017-12-17T21:02:39+5:302017-12-17T21:04:36+5:30
महापालिकेतील कंत्राटदारांनी शनिवारी महापालिका मुख्यालयात काळ्या फिती लावून वित्त अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
आॅनलाईन लोकमत
नागपूर : महापालिकेतील कंत्राटदार दिवाळीपासून प्रलंबित बिलाची मागणी करीत आहेत. परंतु वित्त विभागाकडून प्रतिसाद मिळत नाही. यामुळे संतप्त झालेल्या कंत्राटदारांनी शनिवारी महापालिका मुख्यालयात काळ्या फिती लावून वित्त अधिकाऱ्यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. बिल न मिळाल्यास काम बंद करण्याचा इशारा त्यांनी दिला.
एका कंत्राटदाराचा कॅन्सरमुळे मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना थकीत बिलाची रक्कम देण्यात यावी, अशी वारंवार मागणी करण्यात आली. परंतु वित्त अधिकारी मोना ठाकूर यांनी नकारात्मक भूमिका घेतली आहे. दुसरीकडे एका मंत्र्यांशी जवळीक असलेल्या कंत्राटदाराला तीन दिवसात कोट्यवधीचे बिल देण्यात आले. तसेच पदाधिकाऱ्यांशी जवळीक असलेल्या कंत्राटदारांनाही बिल मिळत आहे. परंतु नियमित काम करणाऱ्यांना आर्थिक स्थिती चांगली नसल्याचे कारण सागून बिल देण्यास टाळाटाळ केली जात आहे.
एलबीटी व जीएसटीच्या वेळी महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट असतानाही तत्कालीन वित्त अधिकारी कंत्राटदारांना बिल देत होते. परंतु सध्या नवीन फाईल मंजुरी व बिल देण्याची प्रक्रिया थांबविण्यात आली आहे. कंत्राटदार हे महापालिकेचाच एक भाग आहे. असे असूनही वित्त अधिकाऱ्यांकडून त्यांना चांगली वागणूक मिळत नसल्याचा आरोप नागपूर म्युनिसिपल कार्पोरेशन कं त्राटदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विजय नायडू यांनी केला आहे. १०० कोटींची बिले थकीत असल्याने कंत्राटदार आर्थिक संकटात असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनात प्रकाश पोटपोसे, संजू चौबे, रमजान भाई, मतीन भाई, अजय लालवानी, युवराज मानकर, शरद दुरुगकर, दिलीप राठी, कमलेश चहांदे, नागसेन हिरेखण व अनिल कुंभारे यांच्यासह कंत्राटदारांचा समावेश होता.
मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार
वित्त अधिकाऱ्यांमुळे महापालिकेतील कंत्राटदार संकटात सापडले आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती विजय नायडू यांनी दिली.