कंत्राटी सफाई कर्मचारी ५ महिने वेतनापासून वंचित
By निशांत वानखेडे | Published: November 7, 2023 07:10 PM2023-11-07T19:10:27+5:302023-11-07T19:10:39+5:30
दिवाळी अंधारात : १४ नंतर उपाेषण आंदाेलनाचा इशारा
नागपूर : प्राथमिक आराेग्य केंद्रात कंत्राटी तत्वावर काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना मागील ५ महिन्यांपासून वेतन मिळालेले नाहीत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाना हाल साेसावे लागत असून दिवाळीसारखा सण अंधारात जाण्याची शक्यता आहे.
वेतन मागणीसाठी या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी १८ ऑक्टाेबरपासून संप पुकारला असून संविधान चाैकात या कर्मचाऱ्यांचे नागपूर जनरल लेबर युनियन (सीटू) च्या बॅनरखाली आंदाेलन सुरू आहे. या कर्मचाऱ्यांना मागील पाच महिन्यांपासून वेतन मिळालेले नाहीत. याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे वारंवार पत्र व्यवहार करूनही त्यांच्या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले. कंत्राटी तत्वावर काम करणारे हे कर्मचारी गेल्या १५ ते २० वर्षापासून सेवा देत आहेत. त्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा नाही आणि वेतनही अर्धे मिळते. वेतन न मिळाल्याने सणासुदीच्या काळात त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी १८ ऑक्टाेबरपासून संप पुकारला आहे. दिवाळीत या कर्मचाऱ्यांचे वेतन झाले नाही तर १४ नाेव्हेंबरपासून अन्नत्याग आंदाेलन सुरू करण्याचा इशारा आंदाेलकांनी दिला आहे.
या आहेत मागण्या
- ५ महिन्याचे थकित वेतन तत्काळ देण्यात यावे.
- दर महिन्याच्या १ तारखेला पगार देण्यात यावा.
- सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना ८ तासाचे काम देऊन शासकीय सेवेत समायाेजित करण्यात यावे.
- कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन व भत्ते लागू करा.
- कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक चार तासाकरीता करण्यात आली असताना त्यांच्याकडून आठ तास काम करून घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी.