संस्कृती टिकण्यात शास्त्रीय कलांचे योगदान : श्रीनिवास वरखेडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2019 11:29 PM2019-09-03T23:29:58+5:302019-09-03T23:33:59+5:30
संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांचे सूत्र पुढे नेणारे शास्त्र म्हणजेच कला असल्याची भावना कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कलेच्या आविष्कारात संस्कृतीची धारणा असते आणि संस्कृती टिकण्यात आपल्या शास्त्रीय कलांचे अनन्यसाधारण योगदान राहिले आहे. संस्कृती, परंपरा आणि जीवनमूल्यांचे सूत्र पुढे नेणारे शास्त्र म्हणजेच कला असल्याची भावना कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालयाचे कुलगुरू डॉ. श्रीनिवास वरखेडी यांनी व्यक्त केली.
कालिदास विश्वविद्यालयातर्फे आयोजित संस्कृत महोत्सवाच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघाच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. व्यासपीठावर आर्ट ऑफ लिव्हिंगचे आचार्य स्वामी हरीहर, विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मधुसुदन पेन्ना, अधिष्ठाता नंदा पुरी, संयोजक डॉ. कृष्णकुमार पाण्डेय, कुलसचिव डॉ. सी.जी. विजयकुमार, समन्वयक डॉ. प्रसाद गोखले उपस्थित होते.
यावेळी, विद्यापीठाच्या विस्तार सेवा मंडळांतर्गत प्राजक्त बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ८ ते १५ आणि १६ ते २५ वयोगटातील विद्यार्थ्यांसाठी एकल व समूह कथ्थक नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. स्पर्धेतील विजेत्यांना प्रमाणपत्र आणि पुरस्कार प्रदान करण्यात आले. ही नृत्य स्पर्धा संस्थेच्या सदस्य नृत्यगुरु प्राचार्या स्वाती भालेराव यांच्या नेतृत्वात आयोजित करण्यात आली. कथ्थक नृत्य मंदिर, नरकेसरी लेआऊट, जयप्रकाश नगर येथे आयोजित या स्पर्धेचे परीक्षण श्वेता गर्गे आणि प्रगती वाघमारे यांनी केले. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या स्पर्धेत एकल नृत्याच्या ८ ते १५ च्या वयोगटात प्रथम क्रमांक मेखला हेजीब, द्वितीय स्वानंदी ठेंगडी, तृतीय इशिता डे आणि चिन्मयी दशरथ तर प्रोत्साहन पुरस्कार आर्या पाठक यांना देण्यात आले. समूह नृत्यात आर्या पाठक, श्रीपर्णा देशमुख, ध्रुव सालोडकर यांना विजयी जाहीर करण्यात आले. १६ ते २५ वयोगटात प्रथम प्राजक्ता पुराणिक, द्वितीय केतकी ताह्मणकर आणि निकिता भडांगे, तृतीय नदीम काळे आणि उत्तेजनार्थ पारितोषिक मृणाल दळवेकर यांना देण्यात आले. समूह नृत्यात अनुष्का संत, सई ओक, नुपूर क्षीरसागर आणि तांडव समूहाला विजयी जाहीर करण्यात आले. स्पर्धेचे उद्घाटन प्राजक्त बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष चारुदत्त मोडक आणि प्राचार्या स्वाती भालेराव यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष अॅड. मदन सेनाड, कार्याध्यक्ष मनोज वढूळकर उपस्थित होते.