अयोध्येतील राम मंदिर निर्माणात नागपूरकर अभियंत्याचे योगदान
By योगेश पांडे | Published: January 21, 2024 11:24 PM2024-01-21T23:24:12+5:302024-01-21T23:24:59+5:30
अविनाश संगमनेरकरांकडून अयोध्येत राहूनच रामकार्य
नागपूर : अयोध्येतील राम मंदिरात सोमवारी श्रीरामांच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी देशभरात उत्साहाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, भव्य मंदिराच्या दर्शनासाठी कोट्यवधी भक्त आसुसलेले आहेत. देशाच्या सन्मानाचे प्रतीक ठरणार असलेल्या या मंदिराच्या निर्मितीत नागपुरातील एका अभियंत्यांचे मौलिक योगदान लाभले आहे. तीन वर्षांपासून त्यांनी इतर सहकाऱ्यांसोबत अयोध्येत राहूनच मंदिर निर्मितीचे शिवधनुष्य पेलले व रामकार्यात आपल्या योगदानाची समिधा अर्पण केली.
नागपूरचे वास्तुविशारद अविनाश संगमनेरकर यांना ही संधी मिळाली व त्यांनी त्याचे सोने करून दाखविले. श्री रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासतर्फे त्यांना २०२० साली पाचारण करण्यात आले होते. मंदिराचे भूमिपूजन होण्याअगोदरच आराखडा तयार होता. प्रत्यक्ष कामात सुरुवात झाली तेव्हा ५० हून अधिक अभियंते, तंत्रज्ञ, प्रकल्प व्यवस्थापक व साडेचार हजारांच्या जवळपास कामगार सहभागी झाले होते. प्रमुख अभियंत्यांमध्ये मराठी चेहऱ्यांचादेखील समावेश होता व अविनाश संगमनेरकर हे विदर्भाचे प्रतिनिधित्वच करत होते. त्यांच्यासह देशातील पाच अभियंत्यांना पूर्ण कामाच्या देखरेखीची जबाबदारी देण्यात आली होती. ट्रस्टच्या वतीने संगमनेरकर व हे अभियंते अहोरात्र कामावर लक्ष ठेवून होते.
अनुभवातून केली प्रत्येक अडचणीतून मात
राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली त्यावेळी सिव्हिल अभियंत्यांची रामाने जणू परीक्षाच पाहिली. पायव्याच्या वेळी काही अडचणी आल्या होत्या. मात्र संगमनेरकर यांच्या अनुभवातून व इतर तंत्रज्ञांच्या सहकार्याने त्यातून मार्ग काढण्यात यश आले. राममंदिर प्रकल्पात प्रत्यक्ष मंदिर उभारणी व परिसराचा विकास हे दोन स्वतंत्र टप्पे होते. आराखड्याप्रमाणे अचूक कामे करण्याची जबाबदारी संगमनेरकर यांच्यासह इतर प्रमुख अभियंत्यांवर होती.
साडेतीन वर्षे अयोध्येतच रामकार्य
ट्रस्टच्या माध्यमातून खासगी कंपन्यांनादेखील कामाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, देखरेखीसाठी संगमनेरकर यांच्यासह पाच प्रमुख अभियंत्यांवर जबाबदारी होती. मंदिर निर्मितीत सिव्हिल, स्ट्रक्चरल, मेकॅनिकल व इलेक्ट्रिकल अभियंत्यांचे काम मोठे होते. त्यातही भव्य मंदिराचा मजबूत पायवा रचणे तसेच मंदिरात कुठलीही त्रुटी राहू नये, यासाठी सिव्हिल अभियंत्यांवर जास्त जबाबदारी होती. कामाचे महत्त्व लक्षात घेता संगमनेरकर हे साडेतीन वर्षांतील बहुतांश काळ अयोध्येतच राहिले. मंदिराजवळीलच रामचरितमानस या वास्तूत त्यांचा निवास होता.
नागपुरातून मिळाल्या होत्या शुभेच्छा
संगमनेरकर यांना या क्षेत्रात तीन दशकांहून अधिकचा अनुभव आहे. त्यांना ज्यावेळी ट्रस्टने ही मोठी जबाबदारी सोपविली त्यावेळी शहरातील संघ स्वयंसेवकांनी त्यांच्या रूपात आपले हातच रामकार्यात लागत असल्याचीच भावना व्यक्त केली होती. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी बजाजनगरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, हे विशेष.