भरारी पथक ठेवणार खते व बियाण्यांवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2019 12:28 AM2019-05-17T00:28:22+5:302019-05-17T00:29:33+5:30
खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी २५ मे नंतर बियाणे विक्रीस उपलब्ध आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खरीप हंगामात बी-बियाणे, रासायनिक खते व कीटकनाशकांच्या गुणवत्ता नियंत्रणासाठी कृषी विभागाकडून जिल्हा व तालुकानिहाय १३ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. यामुळे यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक टळेल व अनाधिकृतरीत्या विक्री होणाऱ्या बियाणे व खतांच्या विक्रीवरही लगाम बसेल, असा दावा कृषी विभागाने केला आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी २५ मे नंतर बियाणे विक्रीस उपलब्ध आहे.
खरीप हंगाम तोंडावर आला आहे. त्यामुळे कृषी विभागाकडून खते व बियाण्यांचे नियोजन करण्यात आले आहे. यंदा ५ लाख ७ हजार ६०० हेक्टवर खरीपाची पेरणी होणार आहे. यात सर्वाधिक क्षेत्र कापसाने व्यापले असून, सोयाबीनचे क्षेत्र गेल्यावर्षी इतकेच कायम आहे. खरीपाचे नियोजन करताना लागणाऱ्या बियाण्यांचेही नियोजन करण्यात आले आहे. कृषी विभागाकडून महाबीज व इतर कंपन्यांकडून बियाण्यांची मागणी नोंदवण्यात येते. मात्र, काही वेळेस शेतकऱ्यांची फसवणूकही होते. काही ठिकाणी बोगस बियाणे विक्रीचे प्रकारही समोर येतात. शेतकऱ्यांची फसवणूक टळावी यासाठी कृषी विभागाकडून भरारी पथक स्थापन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात प्रत्येकी एक असे १३ भरारी पथक तयार करण्यात आले आहे. या पथकाचे तालुका स्तरावर तालुका कृषी अधिकारी हे प्रमुख आहेत. तर जिल्हा स्तरावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी प्रवीण देशमुख हे प्रमुख आहेत. पथकांमार्फत जिल्ह्यात बियाणे, खते व कीटकनाशके योग्य दरात विक्री व निविष्ठा गुणवत्ता सहनियंत्रणाबाबत धडक मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हास्तरीय समितीचे सहनियंत्रण जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे आहे.
नियंत्रण कक्षाची स्थापना
खते, बियाणे व कीटकनाशकाच्या उपलब्धतेसंदर्भात तालुकास्तरीय नियंत्रण कक्ष पंचायत समिती स्थापन करण्यात येणार आहे. जि.प.च्या कृषी विभागात सुद्धा जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष राहणार आहे. १६ मे ते १५ ऑगस्ट दरम्यानच्या कालावधीसाठी नियंत्रण कक्ष राहणार असून, शेतकऱ्यांना काही अडचणी, तक्रारी असल्यास त्याची दखल घेण्यात येणार आहे. बीटी कापसाच्या बद्दलची तक्रार जिल्हा अधिक्षक व तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे करायची आहे. तर बीटी सोडून इतर पिकांबद्दलची तक्रार पं.स.चे कृषी अधिकारी व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांकडे करायची आहे.