‘सीएम वॉररुम’मधून निवडणुकांच्या तयारीवर नियंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2019 12:43 PM2019-02-13T12:43:10+5:302019-02-13T12:44:35+5:30
आगामी निवडणुकांच्या मोहिमेसाठी भारतीय जनता पक्षाने आपली समांतर व्यवस्था उभी केली आहे. ‘पेजप्रमुख’, ‘बूथप्रमुख’, शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारकांची ‘टीम’च बनली असून, त्याला थेट ‘सीएम वॉररुम’शी जोडण्यात आले आहे.
कमल शर्मा ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आगामी निवडणुकांच्या मोहिमेसाठी भारतीय जनता पक्षाने आपली समांतर व्यवस्था उभी केली आहे. ‘पेजप्रमुख’, ‘बूथप्रमुख’, शक्ती केंद्रप्रमुख आणि विस्तारकांची ‘टीम’च बनली असून, त्याला थेट ‘सीएम वॉररुम’शी जोडण्यात आले आहे.
उल्लेखनीय आहे की, भाजपात संघटनेला जास्त महत्त्व देण्यात आले आहे. शहर कार्यकारिणीसोबतच प्रत्येक मंडळाचीदेखील वेगळी कार्यकारिणी आहे, ज्यात मंडळ अध्यक्ष, महामंत्री, मंत्री, प्रमुख अध्यक्ष इत्यादींचा समावेश आहे. पक्षाचे वरिष्ठ नेतादेखील याच्याशी जुळलेले आहेत.
दरवेळी या चमूवर मोठी जबाबदारी असते. मात्र यंदा पक्षाने समांतर व्यवस्था तयार केली आहे. मतदार यादीच्या प्रत्येक पानासाठी एक ‘पेजप्रमुख’ व प्रत्येक ‘बूथ’चा प्रमुख अगोदरपासूनच कार्यरत आहे. यावेळी या संकल्पनेचा विस्तर करीत दोन ते तीन बूथप्रमुखांवर एक शक्ती केंद्रप्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत.
त्यांच्या कामावर लक्ष ठेवण्यासाठी विस्तारक बनविण्यात आले आहेत. ही संपूर्ण चमू संघटनमंत्र्यांच्या नियंत्रणात आहे. त्यांना थेट पुणे व भार्इंदर येथे स्थापित ‘सीएम वॉररुम’शी जोडण्यात आले आहे. त्यांना तेथूनच दिशानिर्देश आणि पक्षाच्या निवडणूक कार्यक्रमांची माहिती देण्यात येत आहे.
मंगळवारी पक्षाचे प्रदेश संघटनमंत्री विजय पुराणिक यांनी ‘मोबाईल कॉन्फरन्सिंग’च्या माध्यमातून शक्तिप्रमुखांशी थेट चर्चा करून त्यांना मार्चपर्यंतच्या कार्यक्रमांची माहिती दिली.
मागील आठवड्यात उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंह रावत आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत झालेल्या शक्ती केंद्रप्रमुखांच्या संमेलनात देण्यात आलेल्या ‘किट’मधील अर्जात केंद्रप्रमुखांना आपल्या क्षेत्राची संपूर्ण माहिती द्यायची आहे; सोबतच त्यांना सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे. सर्वांना महाराष्ट्र भाजपा नावाच्या ‘अॅप’ने जोडण्यात आले आहे. या ‘अॅप’मध्ये शक्ती केंद्र व पेजप्रमुखांचे फोटो व नाव देण्यात आले आहेत.
‘सीएम वॉररुम’च्या सक्रियतेमुळे निवडणुकीच्या मोहिमेला एकरूपता मिळते आहे. तेथून सातत्याने संदेश येत आहेत. त्यामुळे पक्षाच्या कार्यक्रमांची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांपासून ते पेजप्रमुखांना होत आहे. याचा निवडणुकीत फायदा होईल, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष सुधाकर कोहळे यांनी दिली.