वादग्रस्त कोथमिरेंची गडचिरोलीत आमद नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:07 AM2021-05-16T04:07:21+5:302021-05-16T04:07:21+5:30
नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : खंडणीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे यांची बदली ...
नरेश डोंगरे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : खंडणीच्या आरोपांमुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी राजकुमार कोथमिरे यांची बदली होऊन नऊ दिवस झाले. मात्र, त्यांनी अद्याप गडचिरोलीत आमद दिलेली नाही. त्यामुळे पोलीस दलात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.
मायानगरी मुंबईत रमलेले, तेथील नाईट लाइफची सवाई जडलेले पोलीस अधिकारी मुंबई बाहेर बदली झाली की नाकतोंड मुरडतात. त्यातल्या त्यात गडचिरोली गोंदियाच्या नावाने अनेकांना शहारे येतात. त्यांच्या नावे भले कितीही एन्काउंटर असो, नक्षलग्रस्त गडचिरोली गोंदियात बदली झाली की अनेकांना धडकी भरते. ते तिकडे जाण्याऐवजी ‘मॅट, सिक लिव्ह’चा पर्याय निवडतात. एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक असो की वादग्रस्त सचिन वाझे; हे दोघेही गडचिरोली-गोंदिया रेंजमध्ये बदली झाल्यानंतर इकडे रुजू झाले नाही. २०१४ नंतर दया नायक यांची पुन्हा मे २०२१ मध्ये गोंदियाला बदली झाली. मात्र त्यांनी 'मॅट'मध्ये धाव घेऊन या बदलीवर स्थगिती मिळविली. याच दरम्यान मुंबईतील बिल्डर मयूरेश राऊत याला खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देऊन मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग तसेच त्यांचे तेव्हाचे खासमखास समजले जाणारे प्रदीप शर्मा (माजी पोलीस अधिकारी) आणि पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांनी कोट्यवधीची खंडणी उकळल्याची तक्रार झालेली आहे. या प्रकरणांची चौकशी सीआयडी करीत आहे. या पार्श्वभूमीवर, कोथमिरे यांची पोलीस महानिरीक्षक, गडचिरोली यांचे वाचक म्हणून बदली करण्यात आल्याचा आदेश ६ मे रोजी काढण्यात आला. बदली झालेले ठिकाण एक हजार किलोमीटरच्या आतमध्ये असेल तर संबंधित अधिकाऱ्याला तेथे रुजू होण्यासाठी सात दिवसांचा अवधी दिला जातो. मात्र आज, शनिवारी नऊ दिवस होऊनही कोथमिरे यांनी गडचिरोलीला आमद (रुजू होणे) दिलेली नाही. पोलीस दलातील एका शीर्षस्थ अधिकाऱ्यामार्फत कोथमिरे यांनी आपली बदली रद्द करून घेण्यासाठी प्रयत्न चालविण्याची चर्चा आहे. दरम्यान, नमूद कालावधी संपूनही ते गडचिरोलीत रुजू न झाल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कोणती कारवाई केली जाते, त्याकडे संपूर्ण पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.
---
ऑडिओ क्लिपमुळे अडचण
विशेष म्हणजे, कोथमिरे यांच्याविरोधात तक्रार करणाऱ्या बिल्डरने पुरावा म्हणून कोथमिरे आणि मयूरेश राऊत यांच्यात फोनवर झालेल्या संभाषणाच्या क्लिप दिल्या आहेत. त्या तीन क्लिप व्हायरल झाल्याने कोथमिरेंच्या अडचणी वाढल्या आहेत.
---
....तर कारवाईबाबत चर्चा : डीआयजी पाटील
कोथमिरे अजून रुजू झाले नाहीत. ठोस कारणही कळले नाही; त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होणार का, अशी विचारणा गडचिरोली-गोंदिया परिक्षेत्राचे डीआयजी संदीप पाटील यांच्याकडे केली असता ‘सोमवारपर्यंत वाट बघू. नंतर वरिष्ठांशी चर्चा करून कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल,’ असे ते म्हणाले.
---