‘त्या’ वादग्रस्त फेक ट्वीटचा शोध लागला, मुख्यमंत्री शिंदे-बोम्मई यांच्यात चर्चा
By यदू जोशी | Published: December 19, 2022 07:19 AM2022-12-19T07:19:05+5:302022-12-19T07:19:42+5:30
सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलाविले असले तरी त्याने काही फरक पडणार नाही, असे ट्वीटमध्ये म्हटले होते.
यदु जोशी
नागपूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्न पेटलेला असताना कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी रविवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. आपल्या नावे ट्वीट करणाऱ्या व्यक्तीचा शोध लागलेला आहे, अशी माहिती बोम्मई यांनी शिंदे यांना यावेळी दिल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.
विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असताना मुख्यमंत्री आपल्या गटाच्या काही खासदारांशी रामगिरी या नागपुरातील शासकीय निवासस्थानी चर्चा करीत होते. त्याचवेळी बोम्मई यांचा त्यांना फोन आला. मुख्यमंत्री शिंदे आतील खोलीत गेले आणि त्यांची बोम्मई यांच्याशी सुमारे वीस मिनिटे चर्चा झाली. कर्नाटकमध्ये मराठी बांधवांवर हल्ले झाले तर त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटतील. दोन्ही राज्यांसाठी ही बाब योग्य नाही तेव्हा संयम राखणे आवश्यक आहे, अशी विनंती शिंदे यांनी बोम्मई यांना यावेळी केली आणि बोम्मई यांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला, असे सूत्रांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी अलीकडेच मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बोम्मई यांची एकत्रित बैठक दिल्लीत बोलावली होती. त्यावेळी दोन्ही राज्यांच्या तीन-तीन मंत्र्यांची एक समिती स्थापन करण्याचे ठरले होते. आपणाकडून तीन मंत्र्यांची नावे लवकर निश्चित करा, आम्ही ती निश्चित करीत आहोत, असे बोम्मई यांनी शिंदे यांना सांगितल्याची माहिती आहे. बोम्मई यांनी सीमा प्रश्न पेटलेला असताना एक ट्वीट केले होते, ते वादग्रस्त ठरले. सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्र्यांनी बोलाविले असले तरी त्याने काही फरक पडणार नाही, असे त्यांनी म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयात प्रकरण प्रविष्ट असलेल्या सीमा भागाबाबतही त्यांनी वादग्रस्त ट्वीट केले होते. शहा यांच्याबरोबर झालेल्या संयुक्त बैठकीत बोम्मई यांनी ते ट्वीट आपले नव्हते, फेक अकाउंटवरून कोणीतरी केले होते, अशी सारवासारव केली होती.
कर्नाटक विधिमंडळाचे अधिवेशन सोमवारपासून बेळगाव या कर्नाटकच्या उपराजधानीत सुरू होत आहे. सीमा प्रश्नाचे बेळगाव शहर हे केंद्रबिंदू राहिलेले आहे. या परिस्थितीत सीमा भागात शांतता राहावी, हेही बोम्मई यांनी शिंदे यांच्याशी चर्चा करण्याचे महत्त्वाचे कारण मानले जाते.
फेक अकाउंट ऑपरेट करणारा ‘तो’ कोण?
फेक अकाउंटवरून ते ट्वीट कोणी केले होते याचा शोध आम्ही घेतला आहे, अशी माहिती बोम्मई यांनी शिंदे यांना रविवारी मोबाइलवरून चर्चा करताना दिली, तसेच फेक अकाउंट ऑपरेट करणारा एका राष्ट्रीय पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि त्याने मुद्दाम बदनामीच्या हेतूने तसे केले, असेही बोम्मई यांनी स्पष्ट केल्याचे समजते.