'संविधान प्रस्ताविक पार्क' समितीतून नागपूर विद्यापीठात वादंग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 11:33 AM2023-04-05T11:33:33+5:302023-04-05T11:37:29+5:30
कवाडे, गजभिये, मेश्राम, दटकेंना काढले; गिरीश गांधी यांचाही राजीनामा
नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालय परिसरात उभारण्यात येत असलेल्या संविधान प्रास्ताविक पार्क प्रकल्पाच्या समितीतून माजी आमदार जाेगेंद्र कवाडे, प्रकाश गजभिये, आ. प्रवीण दटके व माजी कुलसचिव डाॅ. पुरणचंद्र मेश्राम या ज्येष्ठ सदस्यांना काढण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. कुलगुरू डाॅ. सुभाष चाैधरी यांच्यावर बेजबाबदारपणाची कृती केल्याचा आराेप हाेत असून, या निर्णयाविरुद्ध समिती अध्यक्ष गिरीश गांधी यांनीही राजीनामा दिला आहे. त्यामुळे हे प्रकरण चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
याबाबत कुलगुरूंना पाठविलेल्या राजीनाम्याच्या पत्रात गिरीश गांधी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. संविधान पार्कचे १४ एप्रिल २०२३ राेजी उद्घाटन करण्याची सूचना कुलगुरूंनी समितीला दिली हाेती. अशा वेळी थाेडे काम शिल्लक असताना जुन्या सदस्यांना डावलणे उचित नसल्याचे ते म्हणाले. लाेकवर्गणी व विद्यापीठ निधीतून हे पार्क उभारायचे हाेते. या समितीने ३ वर्षे अभ्यासपूर्वक कार्य करीत राज्य शासनाकडून साडेतीन काेटी निधी मिळवून पार्क उभारणीत माेलाचे याेगदान दिले. पार्कचे काम आता ९० टक्के पूर्ण झाले असून, ते उद्घाटनाच्या टप्प्यात आले आहे. कार्य पूर्णत्वास आणणाऱ्या सदस्यांना अशा पद्धतीने समितीतून वगळणे संयुक्तिक नाही. नवीन सदस्यांना घेण्यास काही हरकत नाही; परंतु त्यासाठी जुन्या सदस्यांना हा प्रकल्प पूर्ण होईपर्यंत व त्याचे उद्घाटन होईपर्यंत समितीत कायम ठेवण्यात यावे, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
पार्कच्या कामाला उशीर हाेण्यामागे विद्यापीठाचासुद्धा मोठा वाटा असल्याचे त्यांनी नमूद केले. मी सर्व सदस्यांसोबत कुलगुरूंना मागील दोन-अडीच वर्षांत भेटून विद्यापीठाला जी कामे करावयाची आहेत ती कामे तातडीने करावीत, अशी विनंती केली होती; परंतु विद्यापीठाने सकारात्मक भूमिका न घेता या कामास विलंब लावल्याचा आराेप गांधी यांनी पत्रात केला आहे.
केव्हा झाली समिती गठित?
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शतकाेत्तर राैप्यमहाेत्सवी जयंती वर्ष उत्साहात साजरे करून विविध कार्यक्रम, उपक्रम राबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले हाेते. त्यानुसार नाेव्हेंबर २०१५ मध्ये तत्कालीन कुलगुरू डाॅ. एस.व्ही. काणे यांच्या मार्गदर्शनात व तत्कालीन कुलसचिव डाॅ. पुरण मेश्राम यांच्या संकल्पनेतून संविधान प्रास्ताविका पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यासाठी समिती गठित करण्यात आली हाेती.
हा निर्णय व्यवस्थापन परिषदेचा
संविधान प्रास्ताविका पार्क समितीच्या जुन्या सदस्यांना समितीतून काढले किंवा डावलले म्हणणे याेग्य नाही. पार्क, लाेकनिधीसाठी नियाेजन करणे, विद्यापीठाला साहाय्यता करणे यासाठी २०१५ मध्ये ही समिती स्थापन झाली हाेती. विधि महाविद्यालयात पुतळा बनून तयार आहे. त्याचे अनावरण व्हावे व प्रकल्पाचे पुढचे कार्य व्हावे म्हणून व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत हा विषय मांडला गेला व चर्चेअंती निर्णय घेण्यात आला.
- डाॅ. सुभाष चाैधरी, कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूर विद्यापीठ