मतमोजणी केंद्रावरील वादावादी : नाना पटोले, वंजारी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2019 02:12 PM2019-05-26T14:12:41+5:302019-05-26T14:57:11+5:30
मतमोजणी केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशाांत पवार यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागपूर : मतमोजणी केंद्रावर वादावादी केल्याप्रकरणी, काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले, अभिजित वंजारी, नगरसेवक बंटी शेळके आणि प्रशाांत पवार यांच्या विरोधात कळमना पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
नागपूर लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीच्या दरम्यान प्रशासकीय अधिकारी आणि काँग्रेस कार्यकर्ते यांच्यात वादावादी झाली. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, मतमोजणीच्या वेळी त्यांना देण्यात आलेले मशिनचे क्रमांक आणि प्रत्यक्ष मोजणी होत असलेल्या मशिनचे क्रमांक यात तफावत होती. यावर काँग्रेसने आक्षेप घेतला. त्यावरून वादावादी झाली. उमेदवार नाना पटोले हे मध्ये पडले. वाद जिल्हाधिका-यांपर्यंत गेला. त्यांच्यातही वाद झाला. मतमोजणी करताना बंद पडलेल्या मशिन्स प्रतिनिधींसमोर दुरुस्त न करता त्या दुसरीकडे नेऊन चालू केल्या आणि त्यातील निकाल प्रतिनिधींना दाखविले, असा आरोप केल्याने त्यांच्यात वाद झाला.
तसेच पूर्व नागपूर मतदारसंघाची मतमोजणी जिथे सुरू होती, त्या ठिकाणी जेव्हा कुठल्या मतदान केंद्रातील व्हीव्हीपॅट मोजायचे यासाठी चिठ्ठया टाकल्या जात होत्या. त्या व्यवस्थित टाकल्या जात नव्हत्या. त्याला पूर्व नागपुरातील काँग्रेसचे प्रतिनिधी अभिजित वंजारी यांनी आक्षेप घेतला. तेव्हाही वाद झाला. तुम्ही कुठल्याही सूचना करू नका. तुम्हाला काही अधिकार नाही, असे जिल्हाधिकारी म्हणाले यावरून तो वाद पेटला.
व्हिडीओतील सगळ्यांवर कारवाई
यासंदर्भात निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी यांना विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, 'ईव्हीएमवर आक्षेप घेणे, निवडणुकीच्या कामात अडथळा आणणे, घोषणा देणे, असे प्रकार केल्यामुळे आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे. २३ तारखेच्या रात्रीलाच तक्रार केली आहे. गोंधळाचा व्हिडीओ आम्ही तपासत असून, त्यात जे जे दिसतील त्या सगळ्यांवर कारवाई होईल.'