अंगणवाडी सेविकांच्या मानधनावरून गिरीश महाजन व यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी
By कमलेश वानखेडे | Published: December 20, 2023 05:53 PM2023-12-20T17:53:54+5:302023-12-20T17:54:36+5:30
ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन आणि आ. यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी झाली.
कमलेश वानखेडे,नागपूर : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात वाढ करण्याच्या मुद्यावरून ग्राम विकास व पंचायत राज मंत्री गिरीश महाजन आणि आ. यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी झाली. मानधनात केलेली वाढ ही तुटपुंजी असल्याचे ठाकूर यांनी सांगितले. यावर गिरीश महाजन यांनी लगेच आपण अडीच वर्षे मंत्री असताना एक रुपया तरी वाढवून दिला का, असा प्रतिप्रश्न केला. या मुद्यावर दोन्ही बाजुंनी जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले. शेवटी अध्यक्षांना हस्तक्षेप करीत हा विषय थांबवावा लागला.
आ. संजय सावकारे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात रावेर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांवरील सोलर सिस्टीमचा प्रश्न उपस्थित केला. यावर मंत्री गिरीश महाजन यांनी संबंधित शाळेत दोन महिन्यात सोलर सिस्टिम सुरू करणार, असे आश्वासन दिले. यावरील चर्चा सुरू असतानाच आ. यशोमती ठाकूर यांनी अंगणवाडी सेविकांना १५ हजार तर मदतनीस यांना १० हजार मानधन देण्याची मागणी केली.
यावर ग्रामविकास मंत्री महाजन यांनी आपण तीन महिन्यांपूर्वीच यांच्या मानधनात २५ टक्के वाढ केल्याचे सांगितले. त्यावर ठाकूर यांनी ही वाढ टक्केवारीत मोजता येणार नाही, असे सांगत पुन्हा वाढ करण्याचा आग्रह धरला. यामुळे िगिरीश महाजन संतापले व आपण मंत्री असताना अडीच वर्षात वाढ का केली नाही, असा थेट सवाल ठाकूर यांना केला. हा माझा विषय नसतानाही आपण प्रश्न उपस्थित करीत आहात. आपण स्वत: मंत्री राहिल्या आहात, असे चिमटे घेत महाजन यांनी ठाकूर यांना लक्ष्य केले.