'तिकडच्या' लाडक्या बहिणींची सोय, 'ईकडच्या' आई-बहिणींची गैरसोय
By नरेश डोंगरे | Published: August 24, 2024 09:26 PM2024-08-24T21:26:55+5:302024-08-24T21:27:14+5:30
या सोयीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या डेपोतील बसेस तिकडे गेल्याने विदर्भातील अनेक गावातील आया-बहिणींची बसेस अभावी मोठी गैरसोय झाली.
नागपूर : शनिवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीद्वय लाडक्या बहिणींच्या भेटीसाठी यवतमाळला येणार म्हणून कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या सुविधेसाठी मोठ्या प्रमाणात 'लालपरी'ची सोय करण्यात आली. मात्र, या सोयीच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणच्या डेपोतील बसेस तिकडे गेल्याने विदर्भातील अनेक गावातील आया-बहिणींची बसेस अभावी मोठी गैरसोय झाली.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा वचनपूर्ती सोहळा आणि महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रम शनिवारी यवतमाळात पार पडला. या कार्यक्रमात महिलांची संख्या लक्षवेधी राहावी, असे आधीच ठरल्यामुळे ठिकठिकाणच्या 'लाडक्या बहिणींना' यवतमाळात आणण्या-नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात खासगी वाहनांची आणि सुमारे ९०० बसेसची आवश्यकता अधोरेखित झाली होती. त्यानुसार, यवतमाळ जिल्ह्यातून २००, अमरावती, अकोलासह बाजुच्या जिल्ह्यातून २००, नागपूर १००, चंद्रपूर-गडचिरोलीतून ७५, विदर्भा बाहेरच्या परभणी, नांदेडमधून प्रत्येकी ५० (एकूण १००) तसेच मराठवाड्यातील अन्य काही जिल्ह्यातून बसेस बूक करण्यात आल्या होत्या.
या बसमधून यवतमाळला येणे-जाणे करणाऱ्या 'लाडक्या बहिणींना भूक-तहान लागेल', हेसुद्धा ध्यानात ठेवून फूड फॅकेट आणि पाण्याच्या बाटल्यांची बसमध्येच व्यवस्था करण्यात आली होती. अशा प्रकारे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्रीद्वयांच्या भेटीसाठी आणि कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींची चांगली सोय झाली. मात्र, अनेक आगारातील बसेस 'त्या' बहिणीच्या सोयीसाठी पाठविण्यात आल्यामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यातील गावोगावच्या आया, बहिणींची मोठी गैरसोय झाली. गावाला जाण्याच्या तयारीत अनेक ठिकाणच्या आया-बहिणी बसची वाट बघत ताटकळत राहिल्या.
... म्हणून वाट्याला प्रतिक्षा आली
गावात येणारी लालपरी बराच वेळ होऊनही गावात का नाही आली, अशी ठिकठिकाणच्या बहिणींकडून (अन् भावांकडूनही) विचारणा होऊ लागली. त्यानंतर तिकडच्या 'लाडक्या बहिणींची' काळजी घेण्यासाठी लालपरीला तिकडे पाठविण्यात आल्यामुळे ईकडे प्रतिक्षा वाट्याला आल्याचे स्पष्ट झाले.