नागपूर रेल्वेस्थानकावर ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सोय; दिव्यांग पोहोचतील थेट बर्थवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2018 10:10 AM2018-04-02T10:10:47+5:302018-04-02T10:10:55+5:30
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावरील सुविधेत वाढ करून ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना कार टू कोच सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने रेल्वेस्थानकावरील सुविधेत वाढ करून ‘व्हील चेअर लिफ्ट’ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्यानुसार अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना कार टू कोच सुविधा नि:शुल्क उपलब्ध होणार आहे. नागपूर विभागाला मिळालेली ही सेंट्रल रेल्वेतील आणि राज्यातील पहिलीच ‘व्हील चेअर लिफ्ट’आहे.
इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कापार्रेशनतर्फे (आयआरसीटीसी) सामाजिक जबाबदारीतून ही व्हील चेअर लिफ्ट नागपूर विभागाला देण्यात आली आहे. चेन्नईच्या कॅलिडायी मोटर वर्क्स कंपनीमार्फत ही सेवा नि:शुल्क देण्यात येणार असून देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी कॅलिडायी कंपनीवर असणार आहे. तीन लाख किंमतीची ही ‘व्हील चेअर लिफ्ट’ प्रवाशांसाठी सुविधाजनक ठरणार आहे. अपंग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्ण चारचाकी वाहनाने स्टेशनपर्यंत येतात. परंतु, बर्थपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. मात्र या अत्याधुनिक व्हील चेअर लिफ्टमुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कार पार्किंगमध्ये उतरल्यानंतर प्रवाशांना आता थेट बर्थपर्यंत पोहचवण्याची सोय उपलब्ध झाली आहे. कॅलिडायी कंपनीने ही सुविधा प्रवाशांना देण्यासाठी एम. गॅबरियल नावाची एक व्यक्ती उपलब्ध करून दिली आहे. ती दोन्ही हातांनी दिव्यांग आहे. जे प्रवाशी चालूच शकत नाही त्यांना कोणत्याही अडथळ््याविना बर्थपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे. यापूर्वी रेल्वेस्थानकावर कुली दिव्यांग प्रवासी, रुग्णांना व्हील चेअरने प्लॅटफार्मवर पोहोचवित असत. प्रवाशांची ने आण करणे सुलभ व्हावे यासाठी कुलींना टप्प्याटप्प्याने या मशीनसंदर्भात प्रशिक्षित केले जाणार असल्याचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक कुश किशोर मिश्रा यांनी सांगितले.
अशी काम करते ‘व्हील चेअर लिफ्ट’
व्हील चेअरला लिफ्टशी जोडण्यात आले आहे. लिफ्टला मागील बाजूस एक सर्किट आहे. या सर्किटद्वारे आॅटोमॅटिक कमांडनुसार बॅटरी कार चालते. कारपासून रेल्वेगाडीपर्यंत लिफ्टच्या साह्याने प्रवाशाला नेण्यात येते. प्लॅटफार्मवर पोहोचल्यानंतर ही लिफ्ट चेअरपासून वेगळी करण्यात येते. त्यानंतर व्हिल असलेली चेअर कोचच्या दारातून आत बर्थपर्यंत जाते.