कोरोनाग्रस्त वन विभागावर अधिवेशनाचेही ‘टेन्शन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2020 10:08 PM2020-09-09T22:08:33+5:302020-09-09T22:11:40+5:30
येथील वन भवनातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. असे असले तरी मुंबईतील पावसाळी अधिवेशनाचा ताण वन भवनावर दिसून आला. मंत्रालयाला कोणत्याही क्षणी कोणत्याही माहितीची गरज पडू शकते, यामुळे या गंभीर परिस्थितीतही कर्मचारी अधिकारी सेवा देताना दिसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : येथील वन भवनातील कर्मचारी आणि अधिकारी मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह निघाले आहेत. असे असले तरी मुंबईतील पावसाळी अधिवेशनाचा ताण वन भवनावर दिसून आला. मंत्रालयाला कोणत्याही क्षणी कोणत्याही माहितीची गरज पडू शकते, यामुळे या गंभीर परिस्थितीतही कर्मचारी अधिकारी सेवा देताना दिसले.
सुरूवातीच्या काळामध्ये येथील वित्त विभागात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर जनसंपर्क विभागातही कोरोनाने शिरकाव केला होता. नंतरच्या काळात एका गार्डला लागण होऊन त्याचाही मृत्यू झाला होता. त्यानंतर सात कर्मचारी पॉझिटिव्ह निघाले होते.
वनभवनामध्ये दक्षतेच्या कारणावरून कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची वैद्यकीय तपासणी केली असता अनेक अधिकारी आणि कर्मचारी अलिकडच्या काळात पॉझिटिव्ह निघाले आहेत. ही संख्या २७ च्या जवळपास असल्याचे सांगण्यात येते. मुंबईमधील अल्प कालावधीच्या अधिवेशनासाठी स्टॉफला अधिक प्रमाणात हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. अधिवेशन असल्याने कोरोनाचा ताण बाजूला सारून येथे उपस्थिती दिसली. यावर अनेकांची नाराजी असली तरी, नाईलाज असल्याने यावे लागते, अशी बोलकी प्रतिक्रिया उमटत आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांना दक्षतेच्या सूचना देण्यात आल्या असून सुरक्षितता बाळगून काम करा, असा सल्लाही देण्यात आला आहे.
दरम्यान, संसर्ग टाळण्यासाठी कार्यालय रोज सॅनिटाईज केले जात आहे, टपालही बाहेरूनच स्वीकारले जात असून निर्जंतुक करूनच संबंधितांकडे पोहचविले जात आहे. वन भवनात कुणालाही प्रवेश दिला जात नसून येथील अहवाल वनमंत्रालयाला पाठविला जात आहे. अधिवेशन संपल्याने आता येथील स्टॉफचा ताणही हलका झाला आहे.